आजच्या युवकाला आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज – डॉ. पी. एस. पाटील

शिवाजी विद्यापीठाची जिल्हास्तरीय एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा मुधोजी महाविद्यालयात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ मार्च २०२४ | फलटण |
आजच्या युवकाला आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि महाविद्यालयातील विविध विभागांच्या अनुषंगाने होणार्‍या कार्यक्रमातून हे प्रशिक्षण देता येणार आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयात बुधवार, दि. ६ मार्च २०२४ रोजी शिवसहाय्यता व आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हास्तरीय एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर होते.

प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करून श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रास्ताविक सादर करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. पी. एच. कदम यांनी महाविद्यालयाच्या कारकिर्दीचा आणि यशाचा चढता आलेख सर्वांच्या समोर ठेवत या जिल्हास्तरीय एकदिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील व सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. चौगले यांनी या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेसाठी जमलेल्या विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना आपत्ती काळात आपली प्रत्येकाची जबाबदारी समजावून दिली.

याप्रसंगी प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आणि महाविद्यालयातील विविध विभागांच्या अनुषंगाने होत असणार्‍या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून आजच्या युवकाला आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज आहे. या प्रशिक्षणाची गरज ब्रँड अँबेसिडर कुमारी प्रिया पाटील या विद्यार्थिनीच्या उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी आजच्या युवकांना उद्बोधित करताना प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकाचे आणि योग अभ्यासाचे महत्त्व विशद केले.

प्रशासनाधिकारी श्री. अरविंद निकम यांनी महाविद्यालयातील या विविध उपक्रमांबद्दल कौतुक करत आजच्या काळात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि त्याची गरज स्पष्ट केली.

कार्यशाळेच्या प्रथम सत्राचे आभार महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अ‍ॅड. डॉ. ए. के. शिंदे यांनी मानले. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होऊन दुपार सत्र सुरू झाले.

दुपारच्या सत्रामध्ये सर्वप्रथम साधन व्यक्ती म्हणून प्रा. सुजित मुंडे यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदी आणि विवेचन’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर श्री. सत्यजित देसाई यांनी ‘आपत्ती पश्चात मानसिक समुपदेशन’ या विषयावर आपले विचार प्रकट केले.

तिसरे साधन व्यक्ती श्री. दिनकर कांबळे जीवरक्षक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक’ या विषयावर आपले व्याख्यान दिले. त्यानंतर अग्निशमन दलाने विविध आपत्तीची प्रात्यक्षिके दाखवत उपस्थितांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविले.

संपूर्ण दिवसभराच्या कार्यशाळेसाठीचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉ. मठपती मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. काळेल मॅडम आणि प्रा. डॉ. अभिजीत धुलगुडे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!