दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अगदी आकाशापासून समुद्राच्या तळापर्यंत कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत, नव्हे काकणभर पुढेच आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केला असेच उपक्रम सर्व शाळांमध्ये झाले पाहिजेत, असे प्रतिपादन प्राचार्य हरिभाऊ अभंग यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले.
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील पूर्व गोखळी येथील हनुमान माध्यमिक विद्यालयामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणूस म्हणून उभारणीचे ज्ञान, प्रेरणा मिळावी, कलागुणांना वाव देण्यासाठी सभाधीटपणा निर्माण व्हावा हे विद्यार्थ्यांसाठी.महत्वाचं व्यासपीठ निर्माण करून दिले. दि. १६ आक्टोबरपासून राष्ट्रमातांच्या विचारांचा स्त्री शक्तीचा जागर आणि कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, समाजसेवा, व्यसनमुक्ती चळवळ आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभंग सर बोलत होते.
नवरात्र महोत्सवानिमित्ताने दिवसभराचे शालेय कामकाज पूर्ण करून अखेरच्या तासांमध्ये दररोज सायंकाळी ४ वाजता राष्ट्रमातांच्या विचारांच्या वेषभूषा परिधान करून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रमातांच्या व्यक्तिमत्वाचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने कु. निकिता माने, धनश्री जाधव यांनी ‘मी जिजाऊ बोलतेय’, कु. नम्रता गायकवाड ‘अहिल्या बोलतेय’, कु. प्राची कुलथे हिने ‘मी झाशीची राणी बोलतेय’, कु. कल्याणी किर्वे, कु. मयुरी चव्हाण यांनी ‘सावित्री बोलतेय’, कु. स्वप्नाली मदने हिने ‘फातिमा शेख बोलतेय’, कु. अनुष्का जगताप हिने ‘लता मंगेशकर बोलतेय’, कु. मयुरी चव्हाण हिने ‘मी सईबाई बोलतेय’ तर कु. श्रेया जाधव आणि कु. सृष्टी मदने यांनी ‘डॉ. आनंदीबाई जोशी बोलतेय’ राष्ट्रमातांच्या भूमिका वेशभूषा करून साकारल्या.
यावेळी गोखळी आणि परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तृत्ववान स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कोरोना साथीच्या काळात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या गोखळी आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिया शेख यांना (आदर्श अधिकारी), सौ. अर्चना चव्हाण यांना (आदर्श माता व राष्ट्रीय माजी हॉकी खेळाडू), सौ. मनिषा धनंजय गावडे यांना (व्यसनमुक्त संघ, महिला युवा उद्योजक), सौ. शालन अनिल गावडे (आदर्श प्रगतशील महिला शेतकरी सेंद्रिय शेती), सौ. दुर्गा आडके (आदर्श आशा सेविका), कु. आकांशा घाडगे (राष्ट्रीय महिला खेळाडू), कु. दिपाली मदने (राज्यस्तरीय कराटे), आसू गावची कन्या भारतीय सिनियर महिला हॉकी संघाने चीन येथे संपन्न झालेल्या एशियन गेममध्ये जपान संघाला २-१ पराभव करून ब्रांज पदक मिळवून देणार्या कु. वैष्णवी फाळके (राष्ट्रीय हॉकी खेळाडू), सौ. शोभा भागवत (आदर्श माता आणि महिला बचत गटाचे उल्लेखनीय कार्य) यांना नवरात्र महोत्सवानिमित्ताने वरील नवदुर्गांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमांची मांडणी व कल्पना मोहन ननवरे सर, राजेंद्र भागवत यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य हरिभाऊ अभंग, मोहन ननावरे सर, सुनील सस्ते सर, किरण पवार सर, विकास घोरपडे सर, शुभांगी भोसले – बोंद्रे मॅडम, राजेंद्र भागवत, विष्णू शिंदे सर, पवार सर यांनी प्रयत्न केले.