स्थैर्य, सातारा, दि. 17 : आज सकाळपासूनच निरभ्र आकाशात काळ्या रंगाच्या ढगांची दाटी होऊ लागली होती . दुपारी 2 वाजता सुरु झालेला हा मान्सूनचा पाऊस अगदी शांतपणे आणि एक सारखा हलक्या स्वरूपात पडत होता .सुमारे पाउण तासाच्या पडण्या नंतर पुन्हा या पावसाने थोडी विश्रांती घेतली .मात्र या पावसामुळे परिसरात थंडावा निर्माण झाला असून सातारा शहर परिसरातील तापमान 24 अंशावर आले आहे.
दरम्यान शेतकरी वर्गामध्ये या पावसामुळे चैतन्य निर्माण झाले आहे. शेतात सुरू असलेली नांगरटी ची तसेच पेरणीपूर्व मशागतीची कामे करून शेतकरी बंधू या पावसाची प्रतीक्षा करत होते. अद्यापही काही शेतातून ही कामे सुरू असून आता या कामांना आणखीन वेग येईल असे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे .दरम्यान सातारा शहरातील राजवाडा. देवी चौक, राधिका रोड ,पालिका चौक येथे सखल भागात पाण्याची तळी साचली होती पालिकेच्या आरोग्य विभागानेही कामांना वेग घेतला असून शहरातील अनेक नाले ,ओढे सफाईचे काम वेगाने सुरू आहे.
दुष्काळी माण तालुक्यात आज मॉन्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली.आजच्या पावसामुळे माण नदी वाहू लागली आहे.
आज सर्वत्र सुरू असलेल्या पाऊसामुळे माणगंगा नदी प्रथमच जून मध्ये वाहू लागली आहे. पळशी ते वरकुटे- म्हसवड दरम्यानच्या नदीपात्रातील बंधारे भरुन म्हसवड येथील शेंबडेवस्ती नजिकचा सर्वात मोठा बंधारा भरण्यास आज सायंकाळी सुरवात झाली असून हा बंधारा भरल्यानंतर म्हसवड शहरालगतच्या नदी पात्रातून पाणी वाहू लागेल.
औंधसह खटाव तालुक्याच्या दुष्काळी पश्चिम पट्टयातील अनेक गावांना मंगळवारी दुपारपासून मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने झोडपून काढले दरम्यान पावसाने दमदार सुरुवात केल्याने दुष्काळी पट्टयातील बळीराजाला दिलासा मिळाला असून यंदा खरीप पिकांचे पेरेही वेळेत सुरू होण्यास यामुळे मदत होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मागील दोन दिवसात हवेत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळी ही उष्णतेमुळे नागरिक हवालदिल झाले होते मात्र सकाळी अकरा नंतर वातावरणातील नूर पूर्णपणे बदलून गेला. मेघगर्जनेसह सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर दुपारी तीन नंतर औंधसह परिसरातील नांदोशी,खबालवाडी, जायगाव,चौकीचा आंबा,घाटमाथा, त्रिमली,वडी, गोसाव्याची वाडी, वरुड व अन्य गावांमध्ये व परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली .या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले तसेच नाल्यांमधून खळाळून पाणी वाहिले.
यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीची लगबग ही ठिकठिकाणी सुरू झाली आहे. सोयाबीन, घेवडा, वाटाणा, बटाटा, कडधान्ये व भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तर काही ठिकाणी पिकांचे पेरे ही सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवेतील उष्णता कमी होण्यास मदत झाली.