आज “श्यामची आई” हे पू. साने गुरुजी यांचं अतिशय सुंदर, सुगंधी व पवित्र असं पुस्तक वाचनात आलं.खरंच पुस्तक वाचून धन्य धन्य झालो.

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, दि.७: साने गुरुजी लिहितात की,”पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरूरी?सुंदर, सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावयास हवा?”श्यामची आई” हे पुस्तक सुगंधी,सुंदर, सुरस आहे की नाही ते मला माहित नाही;परंतु पवित्र आहे असं मी विनयाने म्हणू शकतो.हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे.या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते.हृदय गहिवरून व उचंबळून  आले होते. “श्यामची आई” या पुस्तकातील माझ्या हृदयातील मातेबद्दलच्या प्रेम, भक्ती, कृतज्ञता  वाचून जर वाचकांचे डोळे व हृदय कोरडेच राहणार असतील तर हे पुस्तक त्याज्य,व्यर्थ व निरस समजावे..”
     पुढे साने गुरुजी लिहितात की,”या पुस्तकातील ४२ रात्रींपैकी ३६ रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या.बाहेर आल्यावर ९ रात्री लिहिल्या. यातील ३ रात्री मी काही कारणात्सव वगळल्या आहेत.नाशिक तुरुंगात ९/२/३३रोजी गुरूवारी ह्या रात्री लिहावयास मी सुरूवात केली.व १३/२/३३सोमवारी पहाटे त्या संपविल्या..पाच दिवसांत दिवसा काम करून रात्री व पहाटे मी पुस्तक लिहून काढले.हृदय तर भरलेलेच होते,केवळ भराभरा शाईने कागदावर  ओतावयाचे एवढेच उरलेले..”
    आचार्य अत्रे या साने गुरुजींच्या पुस्तकाविषयी उत्कृष्ट असे रसग्रहण लिहितात.आचार्य अत्रे लिहितात की,ह्या पुस्तकाचे वाचन करणे वा करवून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे.देवादिकांची स्त्रोत्रे आपण म्हणतो, त्याचप्रमाणे साने गुरुजींनी लिहिलेलं ‘मातृप्रेमाचे स्त्रोत्र’घरोघरी वाचले जाते.
     आचार्य अत्रे पुढे लिहितात, “जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी ‘आई’ संबंधी लिहिले असेल,कविता केल्या असतील,गोष्टी लिहिल्या असतील. पण मराठी भाषेत साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्त्रोत्र रचून ठेवले आहे, असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुस-या कोणत्याही वाड्.मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही.जे सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे,तेच सामर्थ्य गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्ये आहे.या दोन्हीही काव्यात शुद्ध आणि निर्मळ प्रेम अगदी तुडूंब भरून वाहत आहे.अमृतदेखील अळणी पडेल,अशी नितांत मधुर स्थळे ठिकठिकाणी या काव्यात अगदी हारोहारीने लागून राहिली आहेत.द्राक्षांचे घडच्या घड लोंबताहेत चहूकडे, त्यातील किती तोडावेत आणि किती चाखावेत?अगदी वेड लागायची पाळी येते खरोखर.ज्ञानेश्वरीप्रमाणे ‘श्यामची आई ‘हे पुस्तक मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे. ह्यात काही शंका नाही. स्फुर्तीच्या,प्रसादाच्या आणि तन्मयतेच्या एका दिव्य अवस्थेतच अशा त-हेचे अलौकिक लेखन संभवते. पुन्हा पुन्हा अशा अदभुत कृती निर्माण होत नाहीत.”
         “गुरूजींना त्यांच्या आईने मोठे केले,,तर गुरजींनीही आपल्या आईला मोठे करून तिचे ॠण फेडले.एवढे मोठे केले की,ती आता केवळ गुरूजींची आई राहिलेली नाही.महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सर्व मुलांची ती आता  आई झालेली आहे.आणि चैतन्याचा जो मधुर पान्हा तिने गुरुजींच्या मुखात  ओतला,तो या देशातील लक्षावधी लोकांना अनंत काळापर्यंत आपल्या हृदयाशी धरून ती यापूढे पाजल्याखेरीज राहणार नाही.”
          “काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात,पण साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहून काढले आहे.त्यातील प्रत्येक अक्षरन् अक्षर गुरूजींनी गहिवरलेल्या अंतःकरणाने आणि डबडबलेल्या डोळयांनी लिहिलेले आहे.त्यातील प्रत्येक वाक्यन् वाक्य दाटून आलेल्या गळ्यातून अन् दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून निर्माण झालेले आहे.त्यामुळे कोरड्या डोळयांनी आणि कोरड्या हृदयाने हे पुस्तक वाचणे अगदी अशक्य आहे.अश्रूंचा गुरूमंत्र तिनेच गुरूजींना दिला,शरीर अन कपडे फार झाले तर साबणाने स्वच्छ होतील पण मन कशाने स्वच्छ करता येईल?अश्रूंनी.म्हणून अश्रुंचे हौद परमेश्वराने डोळयांजवळ भरून ठेवले आहेत.पण त्याची कोणाला आठवण आहे?”
              गरिबीतही स्वाभिमानाने कसे जगावे,मरण आले तरी चालेल पण कधी लाचार व्हायचे नाही.वाईट प्रवृत्तींना विरोध केलाच पाहिजे(उदा.सावकाराच्या दुताच्या अपशब्दांना तिने केलेला विरोध.) अशी या आदर्श आईची शिकवण..
    हे पुस्तक वाचत असताना आपणालाही आपल्या आई-वडिलांविषयी आणखीच प्रेम निर्माण होते.तसेच आपल्या आई-वडीलांचा संघर्ष, त्याग यांविषयीही प्रचंड जाणीव निर्माण होते.डोळयांतून खुप खुप अश्रू येतात.की ज्यांना आपण कितीही प्रयत्न करूनही रोखूच शकत नाही.अशा पुस्तक वाचनातून आपल्या मनावर कोट्यावधी संस्कार होत असतात.आणि अशी संस्कारक्षम मुलं व पिढी ख-या अर्थाने जगाला प्रेम देऊ शकते.व समाजामध्ये अशी संस्कारशील मुलं पुढे आदर्श ठरत असतात.
     म्हणूनच पु.साने  गुरूजी यांचं एक   आदर्श व शक्तिशाली गीत सदैव सर्वांना प्रेरणादायी ठरत असते..
“खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..”
-पुस्तक परिक्षण-
-सचिन रामचंद्र गोसावी
-कवी,लेखक

Back to top button
Don`t copy text!