आज ३१ मार्च – जशी संगत तशी पगंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एक साधू रस्त्याने चालले असतांना त्याना खूप तहान लागली, पुढे गेले तर एका कुंभाराच घर लागले, साधू तिथे गेले आणि पाणी मागितले. त्यानेही त्या साधूंना आदर पूर्वक नमस्कार करून पाणी दिले, पाणी पीत असताना अचानक त्यांच लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेलं, एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं, त्या साधूंनी त्याला विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकंच मडकं वेगळ का रे बाबा ठेवलं आहेस ? तेंव्हा तो म्हणाला, महाराज ते मडकं खराब आहे. त्याला गळती लागली आहे. आणि म्हणुन कोणी ते घेत नाहीए. म्हणून वेगळं ठेवलं आहे.

साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली, तो कुंभार म्हणाला महाराज अहो हव असेल तर चांगलं मडकं घेऊन जा.. फुटकं मडकं नेऊन काय फायदा ? ते म्हणाले देणार असशील तर हेच दे नाहीतर चाललो मी, नाईलाजस्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं.

त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप काल पर्यंत कोणा एका कोपर्याात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या च्या सहवासाने, संत समागमाने देव कार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायची तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्याला ही डोकं लावायचे आणि त्यांच मन प्रसन्न व्हायचं.

जर एक मातीचं मडकं एका साधुच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात ते कुठच्या कुठे पोचत असेल तर आपण तर मनुष्य आहोत. मग आपण जर गुरूंच्या / संतांच्या / चांगल्या व्यक्तींच्या / सज्जनाच्या सहवासात राहू. तर काय आपलं जीवन सुंदर घडणार नाही का ?

सदा सर्वदा सुसंगती घडो, सुजन वाक्य कानी पडो

आपलाच संगतीचा – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!