दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात आयुष्यात…. कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा…. कामाच्या कप्प्यात कार्यालय, सहकारी, स्पर्धा असं काय काय असतं. कुटुंबाच्या कप्प्यात आपला जोडीदार, मुलंबाळं, आई – वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, घरदार, गाड्या – घोडे वगैरे यांच्या बरोबरीनं तारेवरची कसरत राहते.
जगण्यासाठी दोन्ही कप्पे महत्वाचे.कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळतं… कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो. एका कप्प्यात जे मिळतं त्यामुळे दुसऱ्या कप्प्यात जगता येतं.
यातला कामाचा कप्पा हा मनासारखा अथवा न आवडणारा कप्पा इथे कष्ट असतात, नियम असतात, भीषण स्पर्धा असते, करत असलेल्या कामाचं कोणाला कौतुकही असतं/ नसतं, आपल्या लायकीपेक्षा आणि कष्टांच्या मानानं खूप कमी / जादा मोबदला आपल्याला मिळत असतो. म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही.पण जगण्याचं साधन इथं असतं.
कुटुंबाचा कप्पा तसा आपल्याला आवडतो. पण त्यातही डोक्याला कटकटी असतात! जोडीदाराशी भांडणं/मतभेद होत असतात.मुलं ऐकत असतात/ नसतात. आई-वडील हट्टी बनत जात असतात. नातेवाईक तऱ्हेवाईकपणा वागत असतात .मित्राच्या मध्ये ईर्षा,वैचारिक मतभेद एक ना अनेक भानगडी असतात याही कप्प्यात. म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही. पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं!
म्हणून ना एक तिसरा कप्पाही असावा आयुष्यात… आपला स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा! पहिल्या दोन कप्प्यांमधून उद्वेगानं बाहेर पडावंसं वाटलं किंवा हे कप्पे अफाट बोअर झाले तर या तिसऱ्या, स्वतःच्या, कप्प्यात शिरता यायची सोय करून ठेवायला हवी.
जेंव्हा इच्छा होईल तेंव्हा या तिसऱ्या कप्प्यात जाऊन जगता यायला हवं..तशी स्वतःला आणि इतर दोन कप्प्यांना सवय लावता यायला हवी.. मग पहिल्या दोन्ही कप्प्यांचा जाच होत नाही आणि त्यांच्यातही आनंदानं जगता येतं.