
माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील.
प्रत्येकाने चांगले म्हणावे, बरोबर म्हणावे, आपल्या सारखे वागावे असे वाटणे योग्य नाही. कारण त्याला त्याची कृती योग्य वाटते. तो त्याच्या जागेवर अन् आपण आपल्या जागेवर यात कोण योग्य हे आपण नाही ठरवायचे, मग कुणी ठरवायचे. तर त्यासाठी नियती आपल्याबरोबर आहे ना. तिच्यावर सोपवा.
भगवंताने दिलेली मनुष्य जीवाला अनमोल देणगी वाणी हिचा योग्य वापर करणे. बोलून विचार करण्यापरीस विचार करुन बोलणे केव्हाही योग्यच. बोलणं माणसांत सन्मान व अवमान सुद्धा देते. वाणीने समाज जोडणे, मृदु, प्रसंगी कठोर पण तोडणारी नसावी. वाणीला वजन प्राप्त करण्याकरिता सात्विक आहार, वाचन, मनन, चिंतन याबरोबर योग्य व कमीत कमी वापर. अकारण सल्ला देणे, मध्येच बोलणे, मोठ्याने ओरडणे, आपलच बोलून खरे करणे या अपथ्याच पालन केल्यास वाणीद्वारे आपण जिंकलता.
संत, पंत, तंत यांनी आपल्या रसाळ वाणीने जगाला भूरळ घातली. वाणी वाऱ्यापरीस वेगवान, पाण्यापरीस प्रवाही अन् अग्नी परीस ज्वलनशील आहे. आपण वाणीला लगाम घालून मनाच्या कासऱ्याद्वारे येसनीने ओढल्यास ती भरकटणार नाही. तरी वाणी बेताल झाल्यास विवेकरुपी आसूड फटकारल्यास ती जाग्यावर येईल.
जसा विचार तसे कर्म ठरलेलेच. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वैचारिक श्रीमंती लाभण्यासाठी स्थितप्रज्ञा, नितीमत्ता व सत्कर्म यांची जोड दिल्यास प्राप्त होती.
वाणी, विचार, कर्म याने आपली ओळख कशी तयार करायची हे आपण ठरवणे. वाणीचा प्रभाव, विचारांचा जागर व कर्म फलश्रृती याने निश्चित आपली गणना योग्य समुहात केली जाते.