आज ४ एप्रिल – वागणं अन् मागणं एकच असावं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


देवासमोर उभं राहून आपण काय मागतो, आणि देवाकडे पाठ असतांना आपण काय वागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मागणं आन् वागणं यात तफावत झाली की जीवन रहाटगाडगं बिघडलं म्हणून समजावं. मागताना विचारपूर्वक मागावे. देवाकडे काही मागावंच वाटलं तर मला दुःख पचविण्याची ताकद दे असे मागावे. उगाच सुखाचा डोंगर मागून आपणच नीट वागलो नाही तर देवाचा दोष काय ?

एकतर देवाला मागूच नये.कारण त्याने एवढा मोठा मानवी देह दिला आहे. तो स्वकर्तृत्वावर जगण्यासाठी.आपण आपल्या कार्यकर्तृत्वाने विधात्याला स्वतः हून देण्यास भाग पाडावे.देवाची भिती नसावी पण आपल्या कृतीची असावी. फक्त देखल्या देवा नमस्कार अन् सोपस्कार, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असे वागू नये.

आपल्या वागण्याचा मागणीवर परिणाम होतो. म्या एवढं देवदेव केलं, वाऱ्या, खेटं, जत्रा, यात्रा, उपास तापास, अनवाणी चालून सुद्धा देवा तुझा न्यावच वेगळा आहे. करणाऱ्याच मागं भोग. हेच आपलं चुकतंय कारण आपल्या वागण्यात खोट आली की नियत बदली म्हणून समजा. कितीही भक्ती केली तरी निरर्थक समजा. एकवेळ देवदेव करु नका पण नीट वागा. देव देणारच. देवापुढं असताना व्यवस्थित वागायचं अन् देवाच्या माघारी खुशाल शिंदळकी, निंदा, नालस्ती, टीकाटिप्णी, ऊणीधुणी, तुझं माझं करीत बसल्यावर ह्दयीचा भगवंत पाहतोय तेच आपण विसरतोय.

चला तर वागणं अन् मागणं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे कदापि न विसरता मानवी जीवन व्यवहार सुरु ठेवल्यास भगवंत पिढ्यान पिढ्या न मागता देणार. इसवास ठेवा. संसारातून सवड काढा. घटकाभर माणसांत बसा बोला. नाय तर विसावा ठरलेला आहेच.

आपलाच श्रेयस्कर – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!