मोगल सैन्य सुद्धा ज्यांच्या येण्याच्या चाहुलीने “भागो भागो.. मल्हार आया..” म्हणत गर्भगळीत व्हायचे, पेशवाईतही ज्यांना वडीलकीचा मान होता, एक सामान्य मेंढपाळाचा मुलगा ते माळवा प्रांताचे सुभेदार असा अविश्वसनीय प्रवास स्वतःच्या हिम्मतीवर केलेले, ज्यांनी आपलं सर्वस्व मराठा साम्राज्य सिंधू नदीपर्यंत विस्तारित करण्यासाठी पणास लावले व मराठ्यांच्या अटकेपार झेंडे रोवण्यात मोलाचा वाटा उचलला असे इंदोरच्या होळकर घराण्याचे संस्थापक, महापराक्रमी, काळाच्या पडद्यावरील एक उपेक्षित नायक म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर होय.
पुण्यश्लोक अहिल्यामातेचे सासरे अन् त्यांच्या जडणघडणी तील मैलाचे दगड. महापराक्रमी पुत्र खंडेराव लढता लढता धारातीर्थी पडल्यानतंर आभाळा एवढे दुःख उरात लपवून संस्थान व प्रजेला वाली कोण ? त्याकाळची समाज व्यवस्था रुढी परंपरा चालीरिती बाजूला सारुन पुरुष संस्कृतीला छेद देणारे मल्हारराव होळकर अद्वितीय व्यक्तीमत्व यांनी सुनेला सती न जाता प्रजाहितासाठी राज्यकारभाराची धुरा संभाळण्याची आज्ञा केली. अहिल्यामातेने त्या अनुमतीचे सोनं करुन इतिहास घडवला.
सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगांव नीरा माईच्या तीरावर मुरुम ता. फलटण व संस्थान मध्यप्रदेश नर्मदा तीरावर महेश्वरी या ठिकाणी युवा पिढीने नतमस्तक होऊन क्रांती बीजं अंगीकारावे. प्रतिमा पूजन, भाषणे, मिरवणूक याच बरोबर खरा इतिहास बोलत्या व लिहित्या हाताने समाज्यासमोर मांडावा.
महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या फक्त ज्या त्या समाजाने साजरे न करता प्रत्येक समाजाने सहभागी झाल्यास भावी पिढी समोर आदर्श निर्माण होईल. जातीच्या चौकटीत व रंगात महापुरुष बंदीस्त न करता सर्वांनी सुभेदार महापराक्रमी योद्धे मल्हारराव होळकर यांची जयंती अभिमानाने साजरी करु या.