घरट सोडून गेल्याशिवाय ही पाखरांना आकाशाचा अर्थ कळत नाही. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आईच्या कुशीतून अन् बापाच्या आधारांतून बाहेर पडल्याशिवाय लेकरं घडणार नाहीत. पक्ष्यांचा राजा गरुड आपल्या पिलांना घडविताना उंच कड्यावरुन फेकतात व क्षमता सिद्ध करण्यास शिकवतात. तेव्हा हीच पिलं राजपदावर स्वतःच्या खडतर परिश्रमाने, जिद्दीने, कुणाच्या वशील्याशिवाय आरुढ होतात. तेव्हा माता पित्यांचा आनंद गगनात मावत नाही.
आपण आपलं पिलू अन् पिलं मोकळ्या क्षितीजांवर न सोडता सुरक्षितेच्या बंधनरुपी कुंपणात वाढवितो. तिथंच खऱ्या अर्थाने आपण गरुड न बनविता पोल्ट्रीतील लबदुड्या पक्ष्यांप्रमाणे संतती वाढवितो.
आजच्या पाल्यांचे (सर्वच नव्हे) शारीरिक वजन बौद्धिक वजनापरीस जादा व घातक पातळीवर दिसून येतं. शारीरिक सूज हे खानदानी व सुसंस्कृत घरण्याचे वैभव नसून आभासी फसवा देखावा आहे. याला कारणीभूत अति जागरुक पालक वर्ग.
एकलुता एक ल्योक, साता नवसाचा, वंशाचा दिवा, घरण्याचा वारसदार या बिनबुडाच्या आधारावर राहू द्या घरी, त्येला काय कमी आहे, बसून खाल्लं तर सरणार नाही, आमच्या नशीबात नव्हतं, त्याला उपभोगू द्या. मग बसा येळ गेल्यावर (…..)
सध्याच्या कोविड १९ मुळे तर लेकरं भ्रमणध्वनीला चिटकूनच बसली आहेत. दीड जेबी डाटा अन् माझ्या ल्याकाचा थाट् मोठ्ठा यामुळे नुसतं दिसभर लोळणे, खाणं, चुकीचं बसणं, बघणं, सतत परीक्षा तारखेत बदल, घरातच कोंडून यामुळे पाठी व डोळे कमजोर. चिडचिडपणा वाढत चाललंयया. निदान काही कुटुंबात लेकरं एकत्रित राहून संस्कार, आनंद, घरकाम, शेतकाम यात मदत करुन परिस्थितीची जाणिव रहाते. आपली लेकरं पहिली बाहेर गेल्या वर बिघडलं याची धास्ती अन् आता तर घरात एकटं असून सुद्धा जादा भिती.सांगा करायचं काय ? नुसता जीवला घरात घोर अन् बाहेर कोरोनाचा जोर.
पोरांनी कर्तृत्व करण्यासाठी घर सोडून शिव ओलंडल्याशिवाय प्रगती होणार नाही. दोन पिढ्या एकत्रित आल्या की समजूतीपणाच अंतर वाढतच जाणार. नव्या जुन्याचा काही अंशी मेळ बसला नाही. तर मनावर दगड ठेऊन लेकरांना आकाश कवेत घेण्यास मुक्त परवानगी दिल्यास. न भूतो न भविष्यतील प्रगती दिसेल.
दोन लेकरं झाडांवरुन उतरताना दोन्ही मातेपैकी एक संभाळुन तर दुसरी माता तुला जमलं तसं कर म्हणत होती. कोणतं लेकरु यशस्वी होईल. बरोबर आपण त्याला प्रयत्न, धडपड, करण्यास वाव दिल्यास आकाश भरारी निश्चित आहे.
संपत्ती परीस संतती संपत्ती निर्माण करण्यास लायक बनविणे मंजे गगनभरारी