मंजे वरीस भरात तुझं माझं, तंटा, वादविवाद, मतभेद, वैचारिक संघर्ष, गावकी, भावकी, भाऊबंदकी, नात्यातला दुरावा सारे बाजूला सारुन हळूच त्या व्यक्ती पर्यंत जाऊन हलकेच गालाला कोरडा रंग लावून सारे विसरुन जाणे. याचा अर्थ नवचैतन्य.
निसर्गाने विविध रंगाची उधळण करीत जुने विसरुन नव्याच्या स्वागताला चैत पालवीची हिरवीगार कोवळीक, पांढराशुभ्र मोहोर, आम्रवृक्ष हिरव्याकंच कैऱ्याने लगडलेले, पळस, पांगारा लालबुंद फुलांने सजलेले. रणरणत्या उन्हात सुद्धा विविध रंगाने कसे रंगून जावे हे रंगपंचमीच्या निमित्तानं शिकावे.
आपल्या जीवनात सुद्धा विविध जगण्याच्या छटा विविध रंगाने रंगून गेल्या पाहिजे. इंद्रधनुष्यातील सप्तरंग आपल्या लाभावे. रंग खेळताना नैसर्गिक व कोरडे रंग वापरा. देवाचं शिपण अन् आपलं जगणं याचा मेळ मंजे रंगपंचमी. यंदा कोरोनारुपी विषाणुजन्य परिस्थितीत रंगपंचमी साधेपणाने व घरात बसून करावी. आपल्या वागण्याने दुसऱ्याच्या जगण्याचा बेरंग होऊ नये एवढीच काळजी घेऊ.
बालपणीची रंगपंचमी अन् मोठ्यापणीची संसाररुपी रंगपंचमी यात दमछाक होतीय. पण अपेक्षांच्या रंगमंचावर जगण्यात मुखकमलावर विविध प्रकारच्या रंगछटा रेखाटताना खरा जगण्याचा रंगच उडून जातोय. निस्तेज, सुरकुत्या, आकाली पांढरे केस, रंगीत चष्मे, फॅशनच्या जमान्यात रंगाची गॅरन्टी मागायची नसते. सध्या वायु, जल, ध्वनी प्रदुषणांची वेगवेगळी रंगीत रुपे घेऊन आपणाला बेजार केले जातेय.
आपल्या थकलेल्या आई वडीलांच्या उभ्या आयुष्याचा परिपक्व अनुभवी रंग मात्र विसरु नका. लै रंगीबेरंगी खाणे, पाहणे, पिणे यात वाया जायाला येळं लागत नाही.