दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने काही ठिकाणी पिण्याचे टँकर सुरू आहेत. यासंदर्भात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहामध्ये लक्षवेधीद्वारे फलटण, कोरेगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजनेवरील वीज बिल माफ करण्यासंबंधी आ. दीपक चव्हाण यांनी आज आपली बाजू मांडली.
आ. दीपक चव्हाण म्हणाले की, आ. अनिल बाबर यांनी ज्याप्रमाणे टेंभू-ताकारी-म्हैसाळ योजनेबाबत वीजबिल शासनाने भरावे, अशी मागणी केली. तशीच आमच्याही भागामध्ये वसना-वांगना उपसा सिंचन योजना आहे. या योजनेचे वीजबिल शासनाने माफ करावे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच ते म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. धोम-बलकवडी धरणाचे पाणी पिण्यासाठी सोडले आहे. त्याही पिण्याच्या पाण्याची पाणीपट्टी शासनाने भरावी. फलटण तालुक्यात ज्या पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना आहेत, गिरवी प्रादेशिक योजना व सासवड प्रादेशिक योजना, त्या सध्या बंद आहेत. या योजनांमधून टंचाईमध्ये नीरा उजवा कालव्यात पाणी घेऊन ते पाणी पिण्यासाठी लोकांना देत होतो; परंतु नंतरच्या काळामध्ये काही ग्रामपंचायती ते पाणी घेत नव्हत्या. या योजना जेव्हा चालू होत्या, त्यावेळचे लाखो रूपयांचे वीजबिल थकित आहे. या योजना शासनाने पुन्हा सुरू कराव्यात व या योजनांचे वीजबिल शासनाने माफ करावे, असेही ते म्हणाले.
आ. दीपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या वरील मागण्यासंदर्भात उत्तर देताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दुष्काळसदृश तालुक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता होण्यासाठी जलसंपदा खात्याशी चर्चा करून, माहिती घेऊन यासंदर्भात निर्णय घेतले जातील, असे सांगितले.