दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२४ | फलटण |
देशाचे संविधान व देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. येत्या काही काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात, ईव्हीएम मशीनवर होऊ नयेत म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये यासंबंधात याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या याचिकांचा निकाल अद्याप लागलेला नाही, तो केव्हा लागेल, हे माहीत नाही. म्हणून देशातील वकील, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ माणसांनी व नागरिकांनी निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे मत फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या कु. कांचनकन्होजा खरात यांनी एका पत्रकाद्वारे मांडले आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बॅलेट पेपरवर लोकसभेच्या निवडणुका होण्यासाठी देशातील प्रत्येक लोकसभा सीटवर कमीतकमी ५०० ते २००० उमेदवारांचे अर्ज भरले गेले पाहिजेत. जेणेकरून ईव्हीएम मशीन कोणत्याही मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाला वापरता येऊ नये. देशातील वकिलांनी यासाठी पुढे येऊन ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेणार्या निवडणूक अधिकार्यांवर खटले भरण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून कोणताही निवडणूक अधिकारी कोणाच्याही दबावात न येता कारण नसताना कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीत अपात्र किंवा बाद करू नये.
निवडणुका ईव्हीएममुक्त करण्यासाठी नागरिकांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुढील बाबींची तयारी करावी.
निवडणुकीला उभ्या राहणार्या उमेदवाराचे वय २५ वर्ष पूर्ण झालेले असावे.
उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा असल्यास त्या ठिकाणच्या वर्तमानपत्रांमध्ये ते प्रसिध्द करावे व अर्ज भरावा.
अर्ज भरताना लागणार्या सर्व कागदपत्रांची माहिती घेऊन माहितगार व्यक्तींकडून अर्ज भरावेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज बाद होणार नाही.
वरील बाबींसह इतर अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांची तज्ज्ञांमार्फत माहिती घेऊन अर्ज भरून लोकसभेची निवडणूक ईव्हीएममुक्त करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. कांचनकन्होजा खरात यांनी पत्रकाद्वारे नागरिकांना केले आहे.