दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२३ | मुंबई |
महसूल विभागांतर्गत सातबारा उतारा, आठ अ, वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढवणे, ई-करार आणि धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांचे नाव बदलणे, फेरफारविषयक सेवा इ. सेवा व कागदपत्रे आता महा-ई-सेवा केंद्रातून अधिकृतरीत्या घेता येणार आहेत. त्याकरीता सेवाशुल्कही राज्य शासनाने निश्चित केले आहे. त्यामुळे ही कामे करण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणे आता बंद होणार आहे.
राज्य शासनाच्या भूमी अभिलेख खात्याने महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीयुत सातबारा उतारा, आठ अ उतारे उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ई-हक प्रणालीद्वारे वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा कमी करणे किंवा चढवणे, धर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांचे नाव बदलणे आदी कामांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. मात्र, हे उतारे आणि ई-हक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे संगणक, लॅपटॉप, इंटरनेट जोडणी आणि प्रिंटर असतोच असे नाही. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रे, सेतू केंद्रातून या सेवा दिल्या जाणार आहेत. या सेवांचे दर निश्चित केले आहेत. सातबारा उतारा, आठ अ केंद्रचालकांकडून घेताना २५ रूपये शुल्क असेल.
ई-हक सेवा म्हणजे जे फेरफार नोंदणीकृत दस्ताद्वारे होत नाहीत, तर केवळ अर्जाद्वारे होतात, अशा फेरफारसाठी अर्ज करण्यास ई-हक प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी एका अर्जासाठी २५ रूपये शुल्क घेऊन या केंद्रांतून ही सेवा मिळणार आहे. या सेवा घेताना काही कागद घ्यायचे किंवा अपलोड करायचे असल्यास त्यासाठी २५ रूपयांपेक्षा अधिकचे शुल्क असेल.