दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभाग आणि व्हिजन एन. एल. पी. सॉफ्टवेअर कंपनी यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम आणि व्हिजन एन. एल. पी. कंपनीचे. सी. ई. ओ. मयूर गरगडे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. संख्याशास्त्र विभागाच्या तीन विद्यार्थिनींचे गत वर्षामध्ये इन्फोसिस कंपनी मध्ये प्लेसमेंट्स झाले आहे. विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये उत्तम करियर करण्याची संधी प्राप्त होऊन या सामंजस्य करारमुळे विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रोजेक्टचे काम करण्याची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना पदवीनंतर तात्काळ सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो. कंपनीचे सी. ई. ओ. मयुर गरगडे व श्वेता गरगडे यांनी नंतर “डेटा सायन्स” वर एक दिवसीय कार्यशाळा घेतली. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे मा. प्र. प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मनोगतामध्ये विभागाची ही कामगिरी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रातील ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल अशी आशा व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी श्वेता गरगडे या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असल्याची बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन केले.
सायन्स फॅकल्टी इन्चार्ज डॉ. ए. आर. गायकवाड म्हणाले की, विभागाच्या माध्यमातून अशाच प्रकारे प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे की ज्यामुळे महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारण्यासाठी निश्चितच मदत होईल.
या कार्यक्रमप्रसंगी व्हिजन एन. एल. पी. कंपनीचे सी. ई. ओ. मयूर गरगडे, संचालिका श्वेता गरगडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कंपनीच्या संचालिका श्वेता गरगडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना “डेटा सायन्स” कोर्सविषयी सविस्तर माहिती देऊन या क्षेत्रातील नोकरीच्या संधीची कल्पना दिली. संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. सस्ते यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन ऐश्वर्या जगताप यांनी केले. श्री. धीरज पोळ यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.