दैनिक स्थैर्य | दि. १९ डिसेंबर २०२४ | फलटण |
मिरगाव (ता. फलटण) येथील शिवांश मंगल कार्यालयाजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर १३ डिसेंबर रोजी रात्री ११.२३ वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सुमारे ११ जणांच्या टोळीवर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यावेळी झालेल्या धरपकडीत पोलिसांनी चौघांना पाठलाग करून पकडले, मात्र इतर सातजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून टोळीतील सर्वांची नावे निष्पन्न केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
या छाप्यात पोलिसांनी दरोड्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे २,३०,७५० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये तीन मोटारसायकल, मिरची पूड, कात्री, कटावणी, दोन लोखंडी पाने, एक कोयता, पक्कड या साहित्याचा समावेश आहे.
यावेळी पोलिसांनी पाठलाग करून महाजन शांताराम शिंदे (वय २६ वर्ष, रा. वडजल, ता. फलटण), सोल्जर शांताराम शिंदे (वय २० वर्ष, रा. वडजल, ता. फलटण), गरिब्या शिवा काळे (वय २६ वर्ष, रा. वडगाव, ता. फलटण) व विराज संजय पवार (वय १९, रा. भिलकटी, ता. फलटण) या चौघांना पकडले, तर संज्या नमन्या पवार (रा. भिलकटी, ता. फलटण), महावीर उर्फ बहिर्या रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण), रिक्या नमन्या पवार (रा. सासवड, ता. फलटण), लखन रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण), सूरज संज्या पवार (रा. भिलकटी, ता. फलटण), चेंडुगोल उर्फ मर्द रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण) व गोप्या रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण) हे तेथून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस पकडलेल्या आरोपींकडून इतर आरोपींची माहिती घेत असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्रनाथ पाटील करत आहेत.