जिल्ह्यात दोन अपघातांत तीन युवती ठार


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। सातारा। पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा (ता. कर्‍हाड) येथे टेंपो व दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोन युवती जागीच ठार झाल्या. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. टेंपोच्या मागील चाकाखाली त्या सापडल्याने त्या जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. करिष्मा ऊर्फ प्राजक्ता कृष्णत कळसे (वय 27, रा. रेठरे खुर्द, ता. कन्र्‍हाड) व पूजा रामचंद्र कुर्‍हाडे (वय 25, रा. येरवळे, ता. कर्‍हाड) असे मृत युवतींची नावे असल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले.

करिष्मा व पूजा या मलकापूर येथे डी- मार्टमध्ये नोकरी करत होत्या. आज दुपारी साडेचारच्या सुमारास त्या कामावरून सुटल्या. त्यांचा सहकारी आजारी असल्याने त्या वाठार येथे त्यास पाहण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. आटके टप्पा येथे पाठीमागून आलेल्या टेंपो त्यांच्या दुचाकीला घासला. त्यात दुचाकीवरील पूजा व करिष्मा टेंपोच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. टेंपोचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघी जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह अपघात विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महामार्गावर वाहतूक सुरळीत केली.

पुणे-बंगळूर महामार्गावर चिंचणी फाटा (पाटेश्वरनगर) नजीक दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एक युवती साक्षी देशमुख जागीच ठार झाली, तर दुसरी युवती गंभीर जखमी झाली. दुपारी हा अपघात झाला.साक्षी सचिन देशमुख (वय 21, रा. तारळे, ता. पाटण, जि. सातारा) मृत युवतीचे नाव आहे, तर तिची मैत्रीण साक्षी अमृत ढाणे (वय 21, रा. पाडळी, ता. सातारा) ही गंभीर जखमी आहे. दरम्यान, दुचाकीला धडक दिलेल्या कंटेनरचा चालक कंटेनर रस्त्यावर सोडून पळून गेला. या दोघीही सातारा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होत्या. धडक एवढी जोरदार होती, की त्यात साक्षी देशमुख जागीच ठार झाली. साक्षी ढाणे हिच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर व महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.


Back to top button
Don`t copy text!