दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील रावडी येथे ऊसाच्या लागणीवरुन तिघांना मारहाण करण्यात आली. त्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकासह त्यांच्या मुलावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना दि. 13 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन जणावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, एकास खोऱ्याच्या दांडक्याने मारहण केली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ब्रम्हदेव सोपान बोबडे वय 59, रा. गोटेमळा लोणंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ते सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरिक्षक आहेत. आशुतोष मोहन बोबडे हा जमीन गट क्रमांक 363 मध्ये मजुरामार्फत ऊसाची लागण करत होता. त्यास ब्रम्हदेव बोबडे यांनी माझ्या शेतात ऊस लावू नकोस अशी विनंती केली. त्यावरुन आशुतोष याने मी याच शेतात लागण करणार, हे शेत माझ्या वडिलांचे आहे, असे म्हणून त्याने मोहन सोपान बोबडे यांना बोलवून घेतले. मोहन बोबडे हे कोयता घेवूनच तेथे आले. त्यांनी थेट ब्रम्हदेव बोबडे यांच्यावर हल्ला चढवत हाताच्या पंजावर कोयता मारुन जखमी केले. तर डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण करत ऊसाच्या सरीत पाडून अंगावर बसले. गळा हाताने दाबून कोयत्याने कापतोस अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच दरम्यान, सोडवण्यासाठी आलेले यशवंत भोसले यांना आशुतोषने खोऱयाच्या दांडक्याने मारहाण केली. त्यांच्या डाव्या हाताचे कोपरातील हाड मोडले. ब्रम्हदेव यांचा मुलगा आकाश याला मोहन याने कोयत्याने डोक्यास, उजव्या कानाच्या वर कपाळावर वार करुन जखमी केले. तसेच दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. काही मजूरांनी मुलाला व मेहुण्यास वाचवले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली. दरम्यान, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार या करत आहेत.