दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आ. मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी-विक्री मतदारसंघ, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.
त्यामुळे खरेदी-विक्री मतदारसंघातून मकरंद पाटील, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटीतून राजेंद्र राजपुरे आणि कृषिप्रक्रिया मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित 18 संचालकांसाठी माघारीपर्यंत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.