दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात असणाऱ्या ‘सातारा चहा’ टपरीवर चहा घेत असलेल्या एका युवकावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला करणाऱ्या तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कृष्णा शिंदे, गौवर भिसे उर्फ रेट्या, शुभम साळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव विजय विनोद कांबळे असे असून त्याच्यावर कराड येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुभम विनोद कांबळे (वय २६, रा. २६३, बुधवार पेठ, सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवार, दि. ११ रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास शुभम याचा भाऊ विजय विनोद कांबळे हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात असणाऱ्या सातारा चहाच्या टपरीवर चहा पित होता. याचवेळी संशयित कृष्णा शिंदे (रा. कोंडवे, ता. सातारा) हा विजय याच्याजवळ आला आणि ‘तु माझ्या पप्पांना का बोललास..?,’ असे बोलला. याचवेळी गौरव भिसे उर्फ रेट्या आणि शुभम साठे (दोघे रा. मल्हारपेठ, सातारा) याने विजयला शिवीगाळ करत हातात असणारा कोयता, चाकू आणि दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शुभम साठे याने हातातील चाकूने विजयला मारले. याचवेळी विजय पाठीमागे वळल्याने चाकूचा वार त्याच्या पाठीत लागला. ही मारहाण सुरु असतानाच कृष्णा शिंदे याने हातातील कोयत्याने विजयच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला असतात तो वार त्याने डाव्या हाताने अडविल्याने तळहाताला वार झाला. यानंतर कृष्णा शिंदे, गौरव भिसे आणि शुभम साठे हे तिघेही पळून गेले.
या घटनेनंतर विजयला उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याला पुढील उपचारासाठी तत्काळ कराड येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्याबाबतची तक्रार दाखल झाली नव्हती. दरम्यान, मंगळवार, दि. १२ रोजी या अनुषंगाने विजय याचा भाऊ शुभम कांबळे यांने सातारा शहर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिल्यानंतर कृष्णा शिंदे, गौरव भिसे उर्फ रेट्या, शुभम साठे या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे करत आहेत. ही घटना घडल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देवून अधिक माहिती घेत तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.