स्थैर्य, सातारा, दि. 16 : लॉकडाऊन जाहीर झाल्याने गटारी आमावस्येसाठी दारूची आधीच सोय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दारूची चोरटी वाहतूक होवू लागली होती. परंतु, सातारा शहर पोलिसांनी सदर बझार आणि माहूली हद्दीत सापळा रचून विदेशी दारू व इतर साहित्य मिळून तब्बल 9 लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबबात माहिती अशी, देशभर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा दि. 17 पासून 26 पर्यंत लॉकडाउन जाहीर केला. त्या पार्श्वभुमीवर सातारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरटी दारु विक्री व वाहतूक होवू लागली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांचे पो. नि. आण्णासाहेब मांजरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पोलिस पथकाने आज दि. 16 रोजी सकाळपासूनच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय माहिती मिळवण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच सदरबझार तसेच माहुली हद्दीत सापळे रचून चोरटी दारुची वाहतुक करणार्या तिघांवर कारवाई केली. तानाजी आत्माराम शिंदे वय 54 रा. वाकी, ता. जावली, तानाजी नागनाथ मल्लाव वय 31 रा. सोनगांव तर्फ सातारा, सुरेश नारायण पवार वय 38 रा. रविवार पेठ, वाई यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारुच्या मुद्देमालासह इतर साहित्य असा सुमारे 9, 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पो. नि. आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम व हवालदार प्रशांत शेवाळे, पो. ना. शिवाजी भिसे, पो. ना. अविनाश चव्हाण, पो.कॉ. अभय साबळे, किशोर तारळकर, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.