स्थैर्य, सातारा, दि. २५ : वीरकरवाडी येथील नबाजी वीरकर यांनी ओसाड माळरानात तीन एकर क्षेत्रात शास्त्रीय पद्धतीने सिमला मिरचीची लागवड करून पहिल्याच तोडणीत त्यांना दहा टन मिरचीचे उत्पादनातून साडेतीन लाख रुपये शेतातच रोखीने मिळाले आहेत. यापुढील सहा महिन्याच्या कालावधीत मिरचीच्या 15 ते 16 तोडण्या होतील. त्यातून सुमारे पन्नास ते साठ लाखाचे खात्रीशीर उत्पन्न मिळेल असा विश्वास वीरकर यांनी व्यक्त केला आहे.
ओसाड माळरानात सिमला मिरचीचे पिीक घेण्याबाबतची माहिती देताना ते म्हणाले, मी दहा वर्षापूर्वी म्हसवडपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावरील वीरकरवाडी नजीकच ओसाड तीन एकर 11 गुंठे पडीक माळरान खरेदी केली होती. या मुरमाड व खडकाळ माळरानात सिमला मिरचीची लागवड करण्याचा एका जाणकार शेतकर्याने सल्ला मला दिल्यामुळे काहीच काम नसल्यामुळे पडीक माळरानात 550 व 600 फूट खोल दोन विंधन विहिरी घेतल्या. नशिबाने दोन्ही विंधन विहिरीस पुरेसे पाणीही उपलब्ध झाले. त्यामुळे सिमला मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या जून महिन्यातील 18 तारखेस मिरचीच्या रोपांची लागण केली. 57 दिवसात प्रत्येक रोपांची उंची दोन ते अडीच फूट वाढली व प्रत्येक झाड सुमारे दोनशे ते तिनशे ग्रॅम वजनाच्या मिरचीने लगडले. या मिरचीची पहिली तोडणी केली असता कोलकत्ता येथील व्यापार्याने 35 रुपये किलो दराने दहा टन मिरचीची शेतातच रोखीने खरेदी केली. या पहिल्या तोडणीतच मला साडेतीन लाखाचे उत्पन्न मिळाले असून यापुढील किमान सहा महिने त्यांना मिरचीचे उत्पादन मिळणार आहे. पुढील सहा महिन्याच्या कालावधीत प्रत्येक झाडाची उंची चार ते पाच फूट वाढणार असून दरम्यानच्या कालावधीत 15 ते 16 वेळा मिरचीच्या तोडण्या होऊ शकतील व प्रत्येक तोड्यात सुमारे दहा ते पंधरा टन उत्पादन खात्रीशीरपणे मिळू शकेल अशी माहिती वीरकर यांनी दिली. 16 तोड्यात सुमारे 50 ते 60 लाख रुपये मिळतील असा ठाम विश्वास नबाजी वीरकर यांनी व्यक्त केला आहे. वीरकर यांचे शिक्षण इयत्ता दुसरी पर्यंतच झाले असून त्यांनी लॉकडाऊन कालावधीत आर्थिक अडचणीस कंटाळून मिरचीची लागवड करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला त्यात यशही आल्यामुळे परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी त्यांचे मिरचीचे पीक पाहण्यास भेटी देत आहेत. धाडसाने जर आधुनिक पद्धतीने शेती केली तर लाखो रुपयांचे ऊत्पन्न मिळू शकते असा संदेशही नबाजी वीरकर मिरची पिकाचा प्लॉट पाहण्यास येणार्या प्रत्येत शेतकरी कुटुंबांच्या मुलांना देत आहेत.