स्वतःची दूध डेअरी विकलेल्यांना दूध संघावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 19 जुलै 2024 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुका दूध संघाबाबत व इतर सहकारी संस्थांबाबत जे आरोप केलेले आहेत ते पूर्णतः बिनबुडाचे आरोप असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही. वास्तविक पाहता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या असलेल्या स्वराज कारखान्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. यासोबतच हे दूध संघावर बोलत आहेत परंतु यांची स्वतःची असलेली दूध डेअरी सुद्धा यांनी विकली असून यांना दूध संघावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही; असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी – विलास” पॅलेस या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका दूध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की; माजी खासदार रणजितसिंह यांना लोकसभेमध्ये जो पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ते बेचैन झाले असून ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांना फलटण तालुक्यामधून जे मताधिक्य मिळालेले आहे; ते मताधिक्य त्यांनी कसे मिळवले हे संपूर्ण फलटण तालुक्याला ज्ञात आहे. त्यामुळे त्यांनी आता बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. फलटण तालुका सहकारी दूध संघ हा अडचणीत असताना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम आम्ही केलेले आहे.

महानंदाच्या विलीनीकरणामुळे दूध संघ अडचणीत

फलटण तालुका सहकारी दूध संघामधील सर्व दूध हे राज्य शासनाच्या महानंद डेअरीला जात होते. परंतु महानंदा डेअरी ही शासनाच्या माध्यमातून मदर डेरीला चालवायला दिली असल्यामुळे सध्या दूध संघ अडचणीत आलेला आहे. ज्यावेळी दूध संघ आमच्या ताब्यात आला होता तेव्हा दूध संघाची अत्यंत बिकट अवस्था होती. त्यानंतर दूध संघ फायद्यात आणण्याचे काम श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही केलेले आहे; असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.

दूध संघ कायमस्वरूपी सभासदांच्या मालकीचे राहणार!; जे सभासद नाहीत त्यांनी याबाबत बोलू नये

फलटण तालुका सहकारी दूध संघ हा अडचणीतून बाहेर काढण्याचे काम श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी केलेले आहे. दूध संघ अडचणीतून बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम महानंदाचे माजी उपाध्यक्ष तथा तत्कालीन दूध संघाचे अध्यक्ष म्हणून डी. के. पवार यांनी काम केले आहे. त्यानंतर भीमदेव बुरुंगले यांनी सुद्धा दूध संघाचे कामकाज उत्कृष्ट करत फलटण तालुका दूध संघ हा अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. काल ज्यांनी मोर्चा काढून दूध संघावर आरोप केले ते दूध संघाचे सभासद सुद्धा नाहीत; त्यांनी याबाबत बोलूच नये. जे सभासद आहेत त्यांच्याच मालकीचा दूध संघ आहे व यापुढे सुद्धा राहणार आहे; असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

साखरवाडीचा “न्यू फलटण” कारखाना प्रल्हाद पाटलांनी किती रुपयाला घेतला होता? हे जाहीर करावे

साखरवाडीचे महान नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी जे साखरवाडी कारखान्याबाबत आरोप सुरू केलेले आहेत; त्याबाबत त्यांनी अधिक साखरवाडी कारखाना त्यांच्या ताब्यात घेताना तो त्यांनी किती रुपयाला घेतलेला होता; हे जाहीर करून मगच बोलावे. साखरवाडी कारखान्याचा एक हंगाम पूर्णतः वाया गेल्यानंतर कामगारांचे व शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून देता येत नव्हते! त्याच्या नंतर साखरवाडी कारखाना हा श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून अडचणीतून बाहेर काढला आहे; असेही मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सहकारी संस्था अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले

फलटण तालुक्यामध्ये पूर्वी ज्या सहकारी संस्था मग त्यामध्ये विशेषतः श्रीराम सहकारी साखर कारखाना हा पूर्णतः अडचणीत आलेला कारखाना होता. कारखान्यामध्ये लक्ष घालत असताना त्यावेळी आम्हाला सुद्धा अनेक जणांनी सल्ला दिला होता की; सदरील कारखाना हा लिलावात काढून सहकारी मधून खाजगी करून विकत घ्यावा! परंतु श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वामध्ये सदरील कारखाना हा सहकारीच राहण्यासाठी व तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना चालण्यासाठी तो कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्याचा निर्णय त्याकाळी आम्ही घेतला होता. त्यानंतर जवाहर सोबतचा जाण्याचा निर्णय घेतल्याने आता कारखाना पूर्णतः कर्ज मुक्त झालेला आहे; यासोबतच कारखान्याचे विविध उपक्रम सुद्धा सध्या पूर्ण ताकतीने सुरू आहेत; असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले

विमानतळाची जागा सर्वप्रथम कोणी मागितले याची माहिती माजी खासदारांनी घ्यावी

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण विमानतळाच्या बाबत जे आरोप केलेले आहेत. ते पूर्णतः चुकीचे असून फलटण विमानतळा बाबतची जागा ही हिंदुराव नाईक निंबाळकर यांनीच शासनाकडे मागितलेली होती. याबाबतची कागदपत्रे सुद्धा आत्ताच्या घडीला उपलब्ध आहेत. त्यामुळे विमानतळा सोबतच इतर बाबींमध्ये आरोप करताना सर्व माहिती घेऊनच आरोप करावेत बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये; असे मत यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.

मालोजी बँक कोणालाही चालवायला दिली नाही बँकेचा मीच चेअरमन

श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक ही कोणालाही चालवायला दिलेली नसून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्णतः चुकीचे आरोप केलेले आहेत. किंबहुना त्यांना याबाबत माहितीच नसेल की; श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचा मी चेअरमन आहे. यामध्ये श्रीमंत मालोजीराजे बँकेचे कामकाज उत्कृष्टरित्या चालण्यासाठी व बँकेला एका स्तरावर नेण्यासाठी श्रीमंत मालोजीराजे बँकेवर तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये नक्कीच सुधारणा झाली असून बँकेवर कोणतेही निर्बंध नाहीत; असेही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!