कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.८: रक्तदाना इतकेच प्लाझ्मादानही श्रेष्ठ दान आहे. प्लाझ्मा दान केल्याने काहीही त्रास होत नाही. त्यातून गरजूंचा जीव नक्की वाचू शकतो. महाराष्ट्रामध्ये जे कोरोनातून बरे झालेले पाच लाख लोक आहेत त्यातील प्लाझ्मादानासाठी बरेच जण पात्र असू शकतात. या सगळ्या योद्ध्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घेऊन प्लाझ्मा दानाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या चर्चासत्र मालिकेचा समारोप सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागाने होत आहे. या शेवटच्या भागात आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी कोरोना: प्लाझ्मा आणि सिरो सर्व्हेलन्स याविषयी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

आरोग्यमंत्री म्हणाले, प्लाझ्माचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे दहापैकी नऊ केसेसमध्ये प्लाझ्मा दिला गेला ते रुग्ण बऱ्यापैकी लवकर बरे झाले असा त्यातला अनुभव आहे. आपल्या शरीरातील रक्तातून पेशी बाजूला काढल्या तर जे पिवळे द्रव्य उरते तो प्लाझ्मा. त्याच्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्या आपल्या शरीराच्या खऱ्या अर्थाने डिफेन्स मॅकॅनिजम असतात. ज्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त असतात. 

प्लाझ्मा कोण देऊ शकतो? याविषयी मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री म्हणाले, जी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असेल, हिमोग्लोबिन (HB) १२.५ टक्के असेल, वजन साधारणपणे ५० किलोपेक्षा जास्त असेल, कोमॉर्बीडीटी नसेल म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, मुत्रपिंड, हृदयविकार नसतील अशा लोकांचा प्लाझ्मा आपल्याला घेता येतो. जे लोक कोरोनाबाधित बरे होऊन २८ दिवस झाले आहेत त्यांना प्लाझ्मा दान करता येतो. 

प्लाझ्मा देत असताना प्लाझ्माफेरीसीस यंत्रातून काढला जातो. यामध्ये जो दाता आहे त्याचा प्लाझ्मा कम्पलसरी ट्रायटेट केला जातो आणि त्याठिकाणी १:६४ अशा पद्धतीने ते असेल तर तो प्लाझ्मा पात्र असतो. आमच्या संकेतस्थळावर एसबीटीसी (स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिल)” येथे भेट देऊन ज्याला प्लाझ्मा दान करायचाय आणि ज्याला प्लाझ्मा हवाय अशांची नोंद करता येते. 

प्लाझ्मा दानासाठी योग्य प्रकारे समुपदेशन करता आले पाहिजे. प्लाझ्मा देणे हे एक खूप श्रेष्ठदान आहे, हा विश्वास त्याला वाटणे हे महत्वाचे आहे. त्यासाठी त्याचे प्रबोधन करणे, प्रोत्साहित करणे, प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करणे महत्वाचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांनी त्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला तर नक्कीच प्लाझ्मा डोनेशनच्या कार्याला हातभार लागू शकतो. कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या दृष्टीकोनातून या कार्यामध्ये आपण हातभार लावावा, असे आवाहन मी जरूर करेन. 

राज्य शासन, भारतीय जैन संघटना आणि आमच्या लॅब असे आपण एकत्र येऊन मॉडेल तयार करता येईल. तुमची भूमिका प्रोत्साहन देण्याची आहे. एक चांगली व्यवस्था निर्माण करूया. आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन ज्याला प्लाझ्मा द्यायचाय आणि ज्याला घ्यायचाय त्याने तशी नोंद करावी. जे देणारे आहेत आणि जे घेणारे आहेत अशा दोघांनाही तुम्ही संपर्क करून आमच्याकडे सुपुर्द करा. प्लाझ्मादानामध्ये सुद्धा महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होईल. भारतीय जैन संघटनेचे यामध्ये योगदान असावं. 

सिरो सर्व्हेलन्सबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री यांनी सांगितले, एखाद्या समूहामध्ये किती संसर्ग झाला आहे याचं प्रमाण समजून येण्यासाठी केलेला अभ्यास आहे. धारावीमध्ये १०० पैकी ५६ लोकांमध्ये आयजीजी अँटीबॉडीज सापडल्या. याचा अर्थ एवढाच आहे कि प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची सुरुवात झाली. सिरो सर्व्हेलन्स मुंबई, पुणे, मालेगाव आता औरंगाबादमध्ये काही प्रमाणात झाला आणखी काही हॉटस्पॉटमध्ये आपल्याला करता येऊ शकतो असा आमचा मानस आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!