दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । फलटण । महात्मा फुले नगर ( न.पा कामगार वसाहत फलटण) बुद्ध जयंती महोत्सव समिती द्वारा साहस क्रीडा मंडळच्या वतीने मोक्याच्या जागा काबीज करणाऱ्या समाजातील गुणी अधिकारी बांधवांचा सत्कार उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता उपस्थित होते.यावेळी स्पर्धा परीक्षेतील यशवंतांचा सत्कार मा.आयु. तुषार मोहिते साहेब ( जॉईंट इन्कम टॅक्स कमिशनर, मुंबई), विठ्ठल काकडे (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) तसेच अरविंद मेहता (जेष्ठ पत्रकार) यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सर्वच गुणी अधिकारी वर्गांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले,”सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या कष्टातून, प्रयत्नातून, समाजापुढे आदर्श निर्माण केला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. जे या सर्वच अधिकाऱ्यांनी घेतले आहे. मी त्यांच्यासह त्यांच्या सर्व कुटुंबीयांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो. कारण त्यांच्या मदतीशिवाय हे यश मिळू शकत नाही. त्याकाळात समाजातून अनेक अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी या सर्व अधिकाऱ्यांनी इतरांना मार्गदर्शन करावे.” असे आव्हान अरविंद मेहता यांनी केले.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत सत्कार मुर्तीनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ते म्हणाले, सफाई कामगारांची वसाहत अधिकाऱ्यांची वसाहत म्हणून गणली जावी. कोणतेही यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी अथक कष्ट करावे लागतात. यशस्वी होण्यासाठी पैशाची अडचण नसते तर योग्य ध्येयाने , चिकाटीने काम करणे महत्वाचे असते. योग्य ध्येयाने जात असताना पाठीशी शाब्बासकीची थाप अन खंबीर साथ असल्यास यश लवकर मिळते. प्रत्येकानेच अथक संघर्ष करून यश संपादन केले असले तरीही येणाऱ्या पिढीसाठी प्रत्येकाने योगदान देण्यासाठी तत्पर असले पाहिजे.पढे- लिखे लोगोने धोका दिया असे समाजाला वाटू नये. विद्यार्थी, युवकांनी समाजातील स्वार्थी राजकारणी, नेते, पुढाऱ्याच्या नादी लागून स्वता:चे, कुटुंबाचे पर्यायाने समाजाचं नुकसान करू नये. तुमची प्रगती कोणीही करणार नाही. तुमची प्रगती तुम्हीच करू शकता. तेवढी जिद्द, चिकाटी ठेवा. हाताच्या रेषावरून आपले भविष्य घडवू नका तर आपल्या हाताच्या कष्टाने आणि बुद्धीने आपले उज्वल भविष्य निर्माण करा. डाॅ. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या व समाजाच्या विकास व प्रगतीसाठी समान संधी , काही राखीव जागा तसेच प्राथमिक पासून ते परदेशी शिक्षणासाठी स्काॅलरशिची सुविधा दिलेल्या आहेत. त्या मिळविण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे.
अशा प्रकारे आपल्या मनेगतामधून अरविंद मेहता, तुषार मोहिते, ज. विठ्ठलराव काकडे, प्रतिक आढाव, विशाल श्रीमंतराव घोरपडे, संदीप मोरे, स्वरूप अहिवळे , अक्षय अहिवळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, विकास काकडे तर आभार प्रा.अजय अहिवळे यांनी केले.