स्थैर्य, फलटण, दि.२१ : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणच्यावतीने श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री सद्गुरु उद्योग समूह व यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान, फलटण यांच्या सहकार्याने दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक दिवसीय ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’ फलटण येथे आयोजित केले जाते. भरगच्च साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे व राज्यातील प्रमुख साहित्यिकांच्या व मसाप कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीने या संमेलनाद्वारे यशवंतराव चव्हाणांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कार्याचा खास गौरव होत असतो.
पण यंदाच्या ‘कोरोना’ महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यावर्षीचे २५ नोव्हेंबरचे नियोजित ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन’ सध्या तरी स्थगित करण्यात येत आहे. यावर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्य विभागीय मराठी साहित्य संमेलन २७ व २८ मार्च २०२० रोजी फलटण येथे होणार होते. तेही कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. आता ही दोन्ही संमेलने संयुक्तरित्या घेण्यासाठी आम्ही फेब्रुवारी – मार्च २०२१ मध्ये प्रयत्नशील राहू, असे मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी व ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र बेडकिहाळ यांनी जाहीर केले.
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व श्री सद्गुरु उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव व संमेलनाचे कार्याध्यक्ष सचिन सूर्यवंशी – बेडके, मसाप फलटण शाखेचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांच्यासह शाखा पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे व कोषाध्यक्ष सौ.सुनिताराजे पवार यांचेशी चर्चा करुन संमेलनाच्या नियोजित तारखा निश्चित केल्या जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.