यंदा आषाढी वारी पालखी सोहळ्यात होणार संविधानाचा गजर; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । मुंबई । कोविड विषयक निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून खंड पडलेली ‘ज्ञानोबा-तुकोबांची’ पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात देहू-आळंदी वरून पंढरी कडे प्रस्थान करणार आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अभिनव संकल्पनेतून यावर्षी पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषा बरोबरच संविधानाचा देखील गजर करण्यात येणार आहे.

पालखी प्रस्थानाच्या वेळी आळंदी येथून पालखी सोबतच संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असून दि. 21 जून रोजी आळंदी येथून निघणारी ही संविधान दिंडी पालखी मार्गावर सर्वत्र संवैधानिक मूल्यांचा गजर भजन – कीर्तन, अभंग आदींच्या माध्यमातून करत 10 जुलै रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.

अशी असेल संविधान दिंडी :

दि. 21 जून रोजी आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे दुपारी 3 वा. या दिंडीचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 22 रोजी संविधान दिंडी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे येथे मुक्कामास येईल, या दरम्यान राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेतले जातील.

दि. 23 (गुरुवार) रोजी पालखी मुक्काम स्थळाजवळ नाना पेठ येथे ‘संविधान जलसा’ हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट कलाकार तथा विचारवंत नसिरुद्दीन शहा, निलेश नवलखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दि. 24 जून रोजी पासून ते दि. 10 जुलै पर्यंत पालखी सोहळ्यामध्ये संविधान दिंडी संमिलित होऊन, त्यामधून ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन आदी उपक्रम सुरू राहतील. त्याचबरोबर ठिकठिकाणी संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती, संविधानातील हक्क व कर्तव्ये तसेच विविध परिशिष्ट, कलमे आदींचे डिजिटल सादरीकरण, ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप इत्यादी उपक्रम संपूर्ण वेळ राबवले जाणार आहेत.

दि. 24 जून ते 10 जुलै पालखी सोहळा व संविधान दिंडी पालखीच्या ठरलेल्या मुक्काम मार्गावर मार्गक्रमण करत जाईल व पालखी दरम्यान पायी दिंडीत तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वरील उपक्रम राबविण्याचे नियोजन बार्टी मार्फत करण्यात आले असून या संविधान दिंडीचा 10 जुलै रोजी पंढरपूर येथे समारोप होणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

संवैधानिक मूल्यांचा गजर – धनंजय मुंडे

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देहू-आळंदी येथून निघणाऱ्या संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संमिलीत होतात. देशाचे संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे.

पालखीच्या या संपूर्ण प्रवासात हरिनाम घोषासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


Back to top button
Don`t copy text!