स्थैर्य, सातारा, दि. ०३ : बळीराजाकडून आपल्या लाडक्या बैलांचे कौतुक करण्याचा एकमेव दिवस असलेल्या बेंदूर सणावर यंदा करोनाचे सावट असल्याचे चित्र पहाण्यास मिळाले. बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकर्यांची संख्या मर्यादित होती.
शनिवारी साजर्या होणार्या बेंदूर सणाच्या पूर्वसंध्येला आज शेतकरी बांधव खरेदीसाठी गर्दी करतील अशी आशा होती. मात्र, बससेवा बंद असल्याने शहरानजीकच्या ग्रामीणभागातील शेतकर्यांनी बेंदराचे साहित्य खरेदीकडे काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत होते. शहरातील मोती चौक, रविवार पेठ, मल्हार पेठ परिसरातील दुकानात दुपारच्या वेळेत थोड्या प्रमाणात विक्री झाल्याचे दुकानदारांनी सांगितले.
यंदा सर्वच सणांवर करोनाच सावट असताना बेंदरावर याचा प्रभाव जाणवत आहे. शेतकर्यांकडे पैसेच नसल्याने आपल्या लाडक्या बैलांना हौसेने सजवण्यावरही यंदा निर्बंध आले आहेत. अशातच बैलांच्या मिरवणुकांवरही बंदी येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा बैलांच्या सजावटीसाठी लागणार्या साहित्याच्या दुकानात तुरळक प्रमाणात गर्दी होती.