स्थैर्य, मुंबई, दि.२९: मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दिले.
मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल, असे आपण सांगितले. त्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा. तसेच पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुका केल्यामुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. परिणामी सर्वसामान्य मराठा माणसासाठी विकासाचा मार्ग बंद झाला आणि तो रस्त्यावर आला आहे. समाजातील सामान्य माणसाच्या या विषयात भावना तीव्र आहेत, याची अजित पवार यांनी दखल घ्यावी आणि अशी कुचेष्टा करू नये असेही ते म्हणाले.