मुलांवर संस्कार असे करावेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७ – ८ वर्षांचा मुलगा भर दुपारी चालले होते. वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी समान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले.

तो म्हणाला, “बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २ – २ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल.”

बाबा म्हणाले, “हो, पण मी एक बदल सुचवतो बघ…. त्या दगडांच्या ऐवजी आपण २ – २ चांदीचे रुपये ठेऊ या.”

मुलगा म्हणाला, छे, दगडानं जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा.”

पण बाबा म्हणाले, “पहा तर, तुला जास्त मजा येईल.”

मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २ – २ चांदीचे रुपये ठेवले. त्याला वाटत होतं. मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार.

ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला. शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला.

आता त्याचं बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागलं. ‘कालच्यान् अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई. कारभारीनबी उपाशीच. लेकराला दूध नाई. कसं व्हणार ? काय बी समजना.’

मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये ! दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये !!

त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती. ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. ‘आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकडं देईन. मग ती रांधून पोटभर जेवंल आणि लेकरालाबी दूध पाजंल. लेकरू मग खूप खूश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझंबी पोट भरंल.’

मग तो नांगरलेल्या शेतात गेला. वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, ‘देवा, कोनाच्या रूपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास ? ज्येनं ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, ही सारी तुजी दया… म्या आज भरून पावलो.’

हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होतं आहे हे त्यालाच कळत नव्हतं. तो बाबांना म्हणाला, “बाबा,मला काय होतंय, हे मला काहीच कळत नाही. असं वाटतंय की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे. पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उठत आहेत.”

बाबा म्हणाले. “बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना ? त्याचा आशीर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार.”

अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल.

आपलाच संकलक ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!