‘या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजाला भेटायला वेळ नाही’, शरद पवारांची राज्यपालांवर टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , मुंबई , दि .२६: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर केल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा दिला जात आहे. यासाठी संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. यावेळी शरद पवारांनी सर्वांना संबोधित केले. त्यांनी केंद्र सरकारसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावरही तोफ डागली आहे.

राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे
शेतकऱ्यांच्या राज्यपालांच्या भेटीवरुन शरद पवार म्हणाले की, मोर्चानंतर राज्यपालांना भेटून शेतकरी निवेदन देणार आहे. पण मी महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आजवर पाहिलेला नाही. या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजाला भेटायला वेळ नाही, असा टोलाही पवारांनी लगावला.

शेतकऱ्यांचे आंदोलन होते हे राज्यपाल कोश्यारी यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी राजभवनात थांबायला पाहिले होते. मात्र तेवढे धैर्य त्यांनी दाखवलेले नाही. ते गोव्यात गेले मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही अशी पवारांनी केली.

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था नाही – पवार

शरद पवार यांनी आझाद मैदानावर येत केंद्र सरकारला फटकारले आहे. ही लढाई केवळ शेतकऱ्यांनी नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. ज्यांच्या हातातमध्ये सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांविषयी कवडीचीही आस्था नाही असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शेतकरी गेल्या 60 दिवसांपासून आंदोलन करत रस्त्यावर बसला आहे. मात्र देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची चौकशी केली आहे का? असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे.

पंजाबचा शेतकरी पाकिस्तानी आहे का?

तसेच दिल्लीत आंदोलन करत असलेला शेतकरी हा पंजाब आणि हरियाणामधील आहे असे बोलले जात आहे. मात्र पंजाबचा शेतकरी आहे म्हणून काय झाले? पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानी आहे का? असा संतप्त सवालही पवारांनी केला आहे.

कायदा आणताना सविस्तर चर्चा व्हायला हवी
शरद पवार पुढे म्हणाले की, सविस्तर चर्चा न करता कायदा आणले गेले. संसदेत जेव्हा कायदा आणला तेव्हा एका दिवसात एका अधिवेशनात एकदम तीन कायदे मान्य करण्यात आले. कायदा आणताना सविस्तर चर्चा व्हायला हवी असेही पवार म्हणाले. तसेच, जो शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करतो, त्याला समाजकारणातून उध्वस्त करण्याची ताकद आमच्या आहे, हे तुम्ही आज या ठिकाणी दाखवून दिले असेही पवार म्हणाले आणि त्यांनी सर्व उपस्थित आंदोलक शेतकऱ्यांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!