या “फळाचा” नाद केला…अन समृद्धी आली…!!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | फलटण | लातूर जिल्हा म्हणजे पक्क्या बेसाल्टवर बसलेला डेक्कन प्ल्याटूवरचा सगळ्यात टणक भाग… बोली भाषेत मांजरा खडक म्हणतो त्याच मांजरा नदीच्या खोऱ्याचा हा भाग…अशी भौगोलिक ओळख असलेल्या या भागात निसर्गाला पूरक असलेल्या अनेक फळापैकी एक फळ म्हणजे ” सिताफळ ” येतं … रानफळातलं सगळ्यात गोड आणि आरोग्यदायी फळ म्हणून ओळखलं जातं.. याचे शास्त्रीय नाव चेरीमोया असे असून याची मूळ उत्पती दक्षिण अमेरिकेतील अंडस पर्वत राजी इथली… उष्ण कटीबंधीय फळ आहे.

हे सगळं सांगण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल… फार काळ तुमची उत्कंठता न ताणता, मूळ विषयावर येतो..!!
जानवळ येथील ‘येलाले’ हे प्रयोगशील शेतकरी, ते खरे द्राक्षबागायतदार पण काही वर्षांपूर्वी युरोप खंडात पाठवलेल्या द्राक्षात पेस्टीसाईडचा तांत्रिक दोष दाखवून ते द्राक्ष समुद्रात फेकून दिले… त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. त्यात ‘येलाले’ यांचाही माल होता.. त्यामुळे त्यांनाही लाखोचा फटका बसला. त्यातच त्यांनी द्राक्ष बाग मोडली. या लाखोच्या तोट्यामुळे काय करावं या विवंचनेत ते सिताफळाकडे वळले…!!

बाळकृष्ण नामदेव येलाले, तरुण शेतकरी.. शेती आणि शेती मार्केट कोळून प्यायलेले … कमी वयात अधिक अभ्यास करून शेती करणारे… त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेली गोष्ट हजारो शेतकऱ्यांना नवी दृष्टी देऊ शकते. म्हणून त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी केलेला थेट संवाद तुमच्यासाठी

सीताफळाचीच का लागवड?
येलाले म्हणाले,
” एन एम के गोल्डन ” या जातीच्या सिताफळाची 2011 ला लागवड केली… या जातीच्या सीताफळाचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात फळ धारण क्षमता आणि फळ तयार झालं तरी देठ सोडत नाही…फळ तोडल्यानंतर 4 थ्या दिवशी तयार होते, एक फळ 500 ते 700 ग्रॅम भरते…लागवडी नंतर फक्त चार वर्षात फळ लागायला सुरुवात होते. जानवळ हा डोंगरी भाग आहे… इथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तापमान अधिक हमखास असते. जानवळचा डोंगर जवळ आहे त्यामुळे रानटी जनावरं मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात. सीताफळाच्या पानाचा उग्रवास असल्यामुळे कोणतेही रानटी जनावर ते खात नाही. अत्यल्प पाणी हवं असलेलं हे फळ आहे. याला जास्त पाणी झालेतर फळ कमी लागते. यावर्षी फूल धारण करतांना सुरुवातीला पाऊस कमी झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळं धरली गेली. आता झाड फळानी लगडले आहेत. येत्या आठ दिवसात याची तोड सुरु होईल.

सीताफळ इतर पिकापेक्षा परवडते का?

2011 ला सात एकर क्षेत्रात लागवड केली त्यानंतर आता पर्यंत तीन ते चार सिझन मिळाले… सुरुवातीला तेजी होती म्हणून फार म्हणावा तसा भाव मिळाला नाही.त्यानंतर बाजारपेठेचा अभ्यास झाला दलाला शिवाय स्वतः मार्कटला जाऊ लागलो.. त्यामुळे देशभरातल्या मार्केटचा अभ्यास झाला. सिताफळाला एकरी दरवर्षी खर्च अधिकाधिक 50 हजार होतो. एकरी उत्पन्न 5 ते 10 टन होतं, कमीत कमी 25 रुपये किलोचा भाव मिळतो. मागच्या दोन वर्षात या सात एकर मध्ये 40 लाख रुपयाचे सिताफळ
विकल्याचे बाळकृष्ण येलाले सांगतात.
आता शासनाचा कृषि विभाग ” विकेल ते पिकेल ” या योजनेखाली प्रोत्साहन देत आहे. सीताफळ या सारख्या फळाला पल्प तयार करणाऱ्या कंपन्या हे मोठे मार्केट आहे.

सिताफळ मार्केट
हैद्राबाद, दिल्ली आणि नवी मुंबई ( वाशी ) हे देशातील मार्केट आहेत. यातील सर्वात मोठे मार्केट नवी मुंबई ( वाशी ) येथे आहे. अनेक पल्प तयार करणाऱ्या कंपन्या यातले सर्वात मोठे ग्राहक आहे. त्यामुळे चांगल्या जातीचे थोडे जास्त काळ राहणारे सिताफळ कोरडवाहू शेतीत बागायती शेतीचे उत्पन्न काढू शकतात तेही कमी खर्चात… बघा ज्याला रानटी जनावरं खाणार नाहीत पण माणसं आवडीने खातात ती शेती करा. एक फायद्याच्या शेतीचा उत्तम पर्याय आहे.

सिताफळ आरोग्यदायी
सिताफळ वाताळ असते असे म्हटले जाते मात्र एका आंतरराष्ट्रीय न्यूट्रेशन जरनल मध्ये आलेल्या आलिसा पल्लाडिनो यांच्या लेखात उल्लेख केल्या प्रमाणे, सिताफळात उच्च प्रतीचे फायबर असते, व्हिटॅमिन, मिनरल हे घटक तर असतातच त्या शिवाय प्रतिकारशक्ती वाढविणारे असल्यामुळे सिताफळ खाल्यास शरीरातल्या व्याधी म्यूकर रूपात बाहेर येत असल्यामुळे सर्दी झाल्या सारखे वाटू शकते. डोळे आणि हृदयाला आरोग्यदायी आहे. यातून अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन सी, बी (6) मिळत असल्यामुळे हे पृथ्वीवरलं अमृत म्हणायला हरकत नाही…!!

युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर


Back to top button
Don`t copy text!