स्थैर्य, तारळे, (जि. सातारा), दि.९ : येथील तारळे कोंजवडे रस्त्यावर असलेल्या जय जगदंबा पेट्रोल पंपावरून एक नोव्हेंबरला 2200 लिटर सुमारे पावणेदोन लाख रुपयांची डिझेल चोरी झाल्याची फिर्याद पंपचालक अक्षय खबाले-पाटील यांनी तारळे दूरक्षेत्रात दिली. या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील तारळे-कोंजवडे रोडवर असलेल्या जय जगदंबा पेट्रोल पंप अक्षय खबाले पाटील चालवितात. तेथे चार कामगार व एक मॅनेजर कामास आहेत. दररोज दोन कामगार 24 तास ड्युटीला असतात. एक नोव्हेंबरला नेहमीप्रमाणेच अक्षय खबाले पाटील रात्री 11 वाजता पंप बंद करून गेले होते. त्यादिवशी महेंद्र भंडारे व अनिकेत पवार हे दोन कामगार कामावर होते. दोन नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी डिझेल पेट्रोलचा साठा मोजल्यावर तो कमी दिसल्याने सव्वासहा वाजता भंडारे यांनी अक्षय यांना सेलपेक्षा 2200 लिटरने डिझेलचा साठा कमी दाखवत असल्याचे सांगितले.
त्याबरोबर अक्षय हे तातडीने पंपावर आले. सोबत मॅनेजरही आले. पुन्हा स्टॉक चेक केला असता, तसेच ऑनलाइन चेक केला असता तो 2200 लिटरने कमी दाखविला. चोरीचा संशय आल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिले असता, लगतच्या रानात डिझेल सांडल्याचे दिसून आले. यावरून तसेच हिंदस्थान पेट्रोलियमकडून स्टॉक इन्व्हेंटरी रिपोर्ट प्राप्त झाल्यावर काल उशिरा अज्ञात व्यक्तींनी डिझेल चोरले असल्याची तक्रार अक्षय खबाले यांनी दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.