स्थैर्य, फलटण दि.27 : कोळकी व जाधववाडी गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढला असून पोलीस यंत्रणेकडून या भागात रात्रगस्त वाढवण्यात यावी अशी मागणी दोन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांमधून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी या दोन्ही गावांमध्ये अनेक ठिकाणी चोरट्यांकडून चोरीचे प्रयत्न झाले असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. काही ठिकाणी किरकोळ चोर्या देखील घडल्या असून काही ठिकाणी मात्र रहिवाशांच्या प्रसंगावधानाने चोरीच्या घटना टळल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी जाधववाडी परिसरात चोरटे घरफोडीच्या तयारीत असताना शेजारी राहणार्यांना चोरट्यांच्या हालचालीची चाहूल लागल्याने प्रसंगावधानाने व वेळीच पोलीस अधिकारी सदर ठिकाणी पोचल्याने अनुचित प्रकार टळल्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी या भागात रात्रगस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.
फलटण शहराच्यालगत असलेली कोळकी व जाधववाडी ही गावे फलटणची उपनगरे म्हणून नावारुपाला येत आहेत. या दोन्ही ठिकाणी दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. पर्यायाने घरे, बंगले, अपार्टमेंट यांच्याजोडीला दुकाने, इतर व्यावसायिक अस्थापने यांची संख्याही झपाट्याने विस्तारत आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही गावांमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने ठोस उपाययोजना तातडीने होणे क्रमप्राप्त आहे.