दैनिक स्थैर्य | दि. ०५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काल, ४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता, ज्यामुळे अनेक उमेदवारांनी माघार घेतली आहे.
कालच्या अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात २६ उमेदवारी अर्जांपैकी १२ उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता १४ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.
फलटण-कोरेगाव मतदारसंघात होणारी लढत ही अत्यंत चुरशीची असणार आहे. यामध्ये हॅट्रिक आमदार राहिलेले दीपक चव्हाण हे पुन्हा चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीच्या म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून सचिन पाटील हे लढत देत आहेत.
तर यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असलेले प्रा. रमेश आढाव हेच संविधान समर्थन समितीचे अधिकृत उमेदवार असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.
काल अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर लगेचच चिन्ह वाटप सुद्धा करण्यात आले आहे. यामुळे आजपासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार अभियान सुरू करण्याची तयारी केली आहे.
आता प्रचाराची वेळ आली आहे; आणि आम्ही आमच्या उमेदवारांसाठी शर्तीचे प्रयत्न करणार आहोत, असे मत प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.