स्थैर्य, औंध, दि. 20 : सगळीकडे पुर्वमोसमी पाऊसाला सुरुवात झाली आहे,त्यामुळे हुमणीचे प्रौढ भुंगेरे प्रजनन करीता बाहेर पडण्यास मोठ्या प्रमाणात सुरूवात होत असते,त्यामुळे आले,ऊस,सोयाबीन पिकाला धोका निर्माण होऊ शकतो हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गोपूज येथील शेतकऱ्यांनी प्रकाश सापळा बसविण्यास सुरवात केली आहे.कृषी विभागाच्या वतीने हुमनी नियंत्रण मोहीम यशस्वी करण्यासाठी गोपूजमध्ये १०० प्रकाश सापळे बसणार आहेत.
प्रकाश सापळा म्हणजे कडुलिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एक बल्ब लावून त्या खाली मोठ्या घमेल्यात किंवा सपाट वाफा बनवून पाणी सोडणे आणि त्यात १ लिटर डिझेल मिसळले की हा सापळा तयार होतो. त्यात हूमनी भुंगेरे पडून मरून जातात. एक मादी भुंगेरा ५० ते ६० अंडी घालून त्यातून किमान ५० हुमणीच्या आळी तयार होत असतात, असे १०० मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मरून गेले तर एका सापळ्यामुळे जवळपास पाच हजार हुमनीची अळी कमी खर्चात नियंत्रीत होणार आहे आणि सर्वसाधारण एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी पन्नास हजार हुमनी आळी यामुळे नष्ट होऊ शकतात.
गोपूज येथील शेतकरी युवराज शिंदे यांच्या शेतात प्रकाश सापळा बसविण्यात आला असून यावेळी कृषी सहायक व्ही. एस. माने, नितीन शिंदे, पपू मोहिते, मारुती खराडे, संजय गुरव आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावर्षी आले, ऊस, सोयाबिन या पिकांवर मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा असे आवाहन कृषी खात्यामार्फत करण्यात आले आहे.
कमी खर्चात हुमणी नियंत्रणात आणण्यासाठी प्रकाश सापळा उपयुक्त आहे, एकट्या गोपूज गावात शंभर सापळे बसविण्याची आमचा उद्देश आहे. मोठया प्रमाणावर सापळे लावल्यास हुमणी नियंत्रणात येऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मदत होईल : व्ही. एस. माने, कृषी सहाय्यक गोपूज.