मुंबईतील बैठकीला निमंत्रण नव्हतं, शरद पवारांच्या फोननंतर जयंत पाटील मुंबईकडे रवाना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । मुंबई । सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकींच सत्र  सुरू झाले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार पोहोचले आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर राष्ट्रवादीची धुरा पडू शकते असं बोललं जात आहे. दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर आहेत. यामुळे आता उलट-सुलट चर्चां सुरू झाल्या आहेत. बैठकीतून शरद पवार यांनी पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता स्वत: जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी राजीनामा देणे हे योग्य वाटत नाही, त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांना वाटत त्यांनी राजीनामा मागे घ्यावा. आजच्या बैठकी संदर्भात माहित नव्हत. मला याची कोणी कल्पना दिली नव्हती. माझ्या ठरलेल्या बैठकीसाठी मी पुण्याला आलो.

“मी पक्षात राष्ट्रीय पातळीवरील नेता नाही. त्यामुळे या बैठकीचं मला काही माहित नाही. शरद पवार यांच्यासोबत माझ बोलन झालं आहे, त्यानंतर मी आता मुंबईकडे निघालो आहे, असंही पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय का?

काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा धक्का दिला. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यानंतर राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली. या चर्चेवर आता माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण आले आहे.

माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टीकरण पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे. तसेच या संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!