दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२३ । मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून माजी पर्यावरण मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. या देशामध्ये जे कोणी सत्यासोबत उभे आहे किंवा जे कोणी खरं बोलत आहे, किंबहुना जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. हा पॅटर्न देशभरात सर्वत्र सुरू असून कुठेही लोकशाही दिसत नसल्याची टीका त्यांनी केली. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
आयएल ॲण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले. आयएल अँड एफएसच्या कोहिनूर सीटीएनएल मधील गुंतवणुकीसंदर्भात ही चौकशी होते आहे. कोहिनूर सीटीएनएलतर्फे मुंबईतल्या दादर इथे कोहिनूर स्क्वेअरची उभारणी सुरू आहे. ईडीने यासंदर्भात २०१९ मध्ये तपास सुरू केला. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरनंतर ईडीने तपास हाती घेतला. यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
आदित्य ठाकरे नागपूर दौऱ्यावर
महाराष्ट्रामध्ये एका घटनाबाह्य सरकारविरूद्ध आम्ही लढत असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटलांना त्रास दिला जातोय का या प्रश्नावर बोलताना, खोक्यांबद्दल त्यांनाच विचारा, नोटबंदीमुळे त्रास वाढलाय का असा टोला ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रदूषित गावांची पाहणी करणार असून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणी २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली होती. आयएल ॲण्ड एफएस कंपनीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने व मुंबईच्या सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने आयएल ॲण्ड एफएस कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता.