
स्थैर्य, सातारा, दि. २४ : कोरोना अर्थात कोव्हीड १९ च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे आता बंधनकारक राहील. अन्यथा हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रक्कम रूपये २५ हजार दंड तर दुसऱ्यांदा भंग झाल्यास रक्कम रुपये एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीया वाढ होत आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजनैतिक यांच्यासह इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोव्हीड १९ त्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.