स्थैर्य, फलटण, दि. १ : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या माध्यमातून राज्यातील 300 जिल्हा परिषद प्रा. शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून 1 या प्रमाणे 300 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये तरडगाव ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यभरातून निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषद प्रा. शाळा शक्यतो किमान इयत्ता 1 ली ते 7 वी वर्गाच्या शाळा आहेत. काही ठिकाणी 8 वी चे वर्ग जोडण्यात आले असून आदर्श शाळा निकष व परिभाषा यामध्ये काय अपेक्षित आहे याच उल्लेख राज्य शासनाच्या शालेय व क्रिडा विभागाने प्रसिध्द केलेल्या दि. 26 आक्टोंबरच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रामुख्याने आदर्श शाळा निर्मितीमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबींचा समावेश असेल.
भौतिक सुविधांमध्ये या प्रा. शाळांमध्ये सुस्थितीत असलेल्या वर्गखोल्या, आकर्षक इमारत, क्रिडांगण, खेळाचे साहित्य आयसीटी व सायन्स लॅब, ग्रंथालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वतंत्र शौचालये असावीत भविष्यात विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यास इमारत व भौतिक सुविधांच्या विस्तारासाठी वाव असावा.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक व पोषक वातावरण राहील. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जावून शिक्षक विद्यार्थ्यांना नवीन काही शिकवितील सर्व विद्यार्थ्यांना लिहिता वाचता आले पाहिजे त्यासाठी वाचनाचा सराव आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयातील मुलभूत संकल्पना त्यामध्ये वाचन, लेखन व गणितीक्रिया अवगत होणे अनिवार्य आहे. ग्रंथालयामध्ये विविध गोष्टींची पूरक वाचनाची पुस्तके, संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपिडीया उपलब्ध असतील स्वअध्ययनासोबत गट अध्ययन या सारखे उपक्रम राबविले जावेत.
आदर्श शाळेत 21 व्या शतकातील कौशल्य जसे-नवनिर्मितीला चालना देणारे समिक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मुल्ये अंगी बानविणे, संभाषण कौशल्ये वगैरे कौशल्ये विकसित केली जातील. विशेषत: गावातील लोक या शाळांकडे आकर्षित होवून इतर शाळा सोडून या शाळेत आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तयार होतील. तसेच त्यांच्या पाल्याच्या सर्वांगीण गुणवत्ता व व्यक्तीमत्व विकासासाठी विविध शालेय व सहशालेय उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालक उत्सुक असणे ही आदर्श शाळेची व्याख्या असली पाहिजे.
प्रशासकीय बाबींमध्ये प्रामुख्याने शिक्षणातून मुलांचा शारिरीक, बौध्दीक व मानसिक विकास होणे हे आदर्श शाळेचे मुख्य उदिष्ट असेल विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयातील अध्ययन फलनिष्पत्तीसह त्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात विविध आव्हानांना समोर जाण्यासाठी योग्य नेतृत्वगुण विकसित करुन विविध सहशालेय उपक्रमात जसे क्रिडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन वगैरे विषयांमध्ये प्राविण्य मिळवून देणारी तसेच विविध क्षेत्रातील कौशल्ये विकसित करणारी शाळा म्हणजे आदर्श शाळा असली पाहिजे.
विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ताण विरहित वातावरण उपलब्ध असले पाहिजे पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलिकडे जावून त्यांना शाळा व शाळेच्या परिसरातील उपलब्ध सामुग्रीतूनही विविध विषयातील ज्ञान अवगत करता यावे यासाठी आठवड्यातून किमान 1 दिवस दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता मिळावी या उद्देशाने प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम आदर्श शाळेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात उंब्रज (कराड), कुरोली सिध्देश्वर (खटाव), एकंबे (कोरेगाव), भिलार (महाबळेश्वर), पानवण (माण), तारळे (पाटण), तरडगाव (फलटण), खानापूर (वाई), वर्णे (सातारा) या 9 जिल्हा परिषद प्रा. शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यासाठी निवडण्यात आल्या आहेत.