
दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । सातारा । केळवली धबधब्यात शुक्रवारी दुपारी पाण्यात बुडालेल्या युवकाचा अजुनही तपास सुरु असून शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरु असलेला तपास शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होता. घटनास्थळी तहसीलदार आशा होळकर तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीम तळ ठोकून आहेत.
सातारा येथील 3 युवक शुक्रवारी दुपारी धबधबा गेले होते. यावेळी राहुल माने वय 18 हा युवक ज्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते त्या पाण्याच्या प्रवाहतच बेपत्ता झाला. यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा ही केला. भीती पोटी ते युवक सातारला आले. सायंकाळी उशीरा कुंटुंबियांना हि घटना समजल्यावर तालुका पोलिस स्टेशनमध्ये घटना कळवली. मात्र ज्या ठिकाणी तो युवक बेपत्ता झाला होता. त्याठिकाणी रात्री उशीरा तपास करणे शक्य नसल्याने सातारा पोलीस दल तसेच ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तपास यंत्रणेला सुरुवात केली.
पहाटे लवकर माने कुटुंबियांचे नातेवाईक मित्र परिवार केळवलीमध्ये दाखल झाला होता. यानंतर सातारा तालुका पोलीसदलाचे कर्मचारी दाखल झाले. यांनी शोधकार्य सुरु केले. मात्र त्यांनाही यश आले नाही. सकाळी आकरा वाजता तहसीलदार आशा होळकर, मंडलअधिकारी युवराज गायकवाड यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला. दुपारी 3 वाजता छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमचे जवान आपल्या साहित्यासह दाखल झाले. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच मोठ मोठे दगड तसेच खोल पानी यामुळे शोधकार्य करण्यात अडथळा निर्माण होत होता.
एनडिआरएफच्या टीम पाचारण करण्यात येईल : आशा होळकर
खोल पाण्याचा प्रवाह आत्याधुनिक पाण्यात बुडून शोधघेण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने वरिष्ठांशी बोलून पुण्यातील एनडिआरएफ टीमला बोलवून उद्या तपास घेण्यात येईल. असे आशा होळकर यांनी सांगितले.
धबधबा परिसरात पर्यटकांना मज्जाव
केळवली धबधबा परिसरात शोधकार्य सुरु असल्याने धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांसाठी मज्जाव करण्यात आला. शनिवार रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठा होता. मात्र धबधबा परिसरातील घटना समजताच पर्यटकांना तपास होईपर्यंत मज्जाव करण्यात आला होता.