
दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२३ | फलटण |
सुरवडी, ता. फलटण येथील कमिन्स कंपनीमध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने नोकरीत समाविष्ट करून घेण्याबाबत सुरवडीतील युवक व ग्रामस्थ वारंवार मागणी करीत असून २६ जानेवारी २०२३ रोजी ग्रामसभेमध्ये झालेल्या ठरावानुसार कमिन्स प्रशासनाला व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर यांना ग्रामपंचायत प्रशासनाने स्थानिक युवकांना कंपनीच्या नोकरीमध्ये प्राधान्याने समाविष्ट करून घेण्याची मागणी केली होती. मात्र, यावर कंपनीकडून कोणताही उचित कार्यवाही न झाल्याने गुरुवार, दि. ९ मार्च रोजी सुरवडी येथील कमिन्स कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील युवक, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व कमिन्स कंपनीचे गिरीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये असे म्हटले आहे की, कमिन्स कंपनीने येत्या ७ दिवसात स्थानिक युवकांना नोकरीमध्ये समाविष्ट करून न घेतल्यास फलटण येथील नाना पाटील चौक ते प्रांत कार्यालय या ठिकाणी गावातील ग्रामस्थ ‘अर्धनग्न व भीक माँगो’ आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी सुरवडीचे माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, उपसरपंच विजय खवळे, मजूर फेडरेशनचे संचालक अंकुश साळुंखे पाटील, बाजार समितीचे माजी संचालक किरण साळुंखे पाटील, माजी उपसरपंच बाळासो जगताप, पोलीस पाटील संतोष पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हंगे, सुरवडीतील युवक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.