स्थैर्य, रहिमतपूर, दि. 12 : सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलेल्या रुग्णांची, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सेवाभावी वृत्तीने देखभाल करणार्या कर्मचार्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षकांचे नेते सिद्धेश्वर पुस्तके यांनी कोरोना योध्द्यांच्या सत्कारप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटर जिल्ह्यात आदर्शवत असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हा. चेअरमन सुनील माने, रहिमतपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्षा सौ. माधुरी भोसले, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी विनायक औंधकर व श्री. गाडगे महाराज मिशन, मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते-पाटील यांनी सुरुवातीपासून केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे व घेतलेल्या दक्षतेमुळे या सेंटरमधील एकही कर्मचारी, कोराना रुग्णांची सेवा करताना बाधित झाला नाही. त्यांच्या परिश्रमामुळे कोरोनाचा प्रसार झाला नाही. याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी ब्रह्मपुरी कोविड सेंटरमध्ये गेली चार ते पाच महिने स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा देणार्या जिगरबाज व खर्या अर्थाने कोविड योद्धा असणार्या आरोग्य विभागातील डॉ. मोरे पाटील डॉ. श्रीमती डांगरे, डॉ. बगले, नगरपालिका कर्मचारी अशोक जाधव, दीपक जावळे, मयूर घोलप, सुमित वर्पे, सुनीता भिसे ,पोलीस कर्मचारी रोहन केंजळे, रुग्णवाहिका चालक बर्गे, आश्रमशाळा कर्मचारी सुदाम घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज.ग माने, बलवंत माईनकर, साताराजि. प. शिक्षण समितीचे सदस्य रूपेश जाधव, शिक्षक बँकेचे संचालक मोहनराव निकम, कोरेगाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बजरंग वाघ,जगन्नाथ भोसले, आर. आर. भोसले, महिपत माने, राजेंद्र झांजुर्णे, धनाजी पवार, दादासाहेब थोरात, प्रवीण घाडगे, दीपक माने, बोबाटे, घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.