मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वात फलटणमध्ये पालखी सोहळ्यात नगरपालिकेचे कामकाज कौतुकास्पद


दैनिक स्थैर्य | दि. 30 जून 2025 | फलटण | फलटणमध्ये आषाढी वारीच्या संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यानंतर फलटण नगरपालिकेच्या कामकाजाचे प्रशासन आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कौतूक केले आहे. पालखीच्या प्रस्थानानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबवली गेली, ज्यामुळे कचरा व दुर्गंधीचा त्रास यशस्वीपणे टाळण्यात आला.

फलटण शहरातील पालखी सोहळा अत्यंत सुव्यवस्थीत पार पडण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती. नगरपालिकेच्या 13 वॉटर फिटिंग पॉईंट्सवरून सुमारे 1000 वारकऱ्यांना साधारणतः १० हजार लिटर शुद्ध पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात आले. पालखी मुक्कामी असलेल्या तळावरील पंचायत समिती, आरोग्य विभाग आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्याकडून वैद्यकीय सेवा उत्कृष्ट रितीने दिली गेली. 1992 जर्मन टेन्टवर 1240, सावता माळी मंदिर येथे 1645 वारकऱ्यांनी वैद्यकीय मदत घेतली.

याशिवाय, यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या जर्मन हँगरमध्ये 150 फिजिओथेरपी विद्यार्थी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे वारकऱ्यांना मसाज सेवेची सुविधा पुरवली, ज्याचा लाभ सुमारे 4000 वारकऱ्यांनी घेतला.

स्वच्छतेसाठी फलटण नगरपरिषदेकडून 70 कर्मचारी, खाजगी तत्वावरील 25 कर्मचारी, सातारा जिल्ह्यातील कराड, महाबळेश्वर, मलकापूर यातील 100 कर्मचारी, तसेच कागल नगरपरिषद आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 25 कर्मचारी तसेच सावित्रीबाई फुले विद्यापीठातील 150 विद्यार्थी युनिटने एकत्र येऊन कचरा संकलनासाठी कार्य केले. पाच ट्रॅक्टर ट्रॉली, दोन जेसीबी मशीन आणि १६ घंटा गाड्यांच्या साह्याने पालखी तळावर सुमारे पाच टन आणि शहरात तीन टन कचरा यशस्वीपणे संकलित करण्यात आला. कराड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भरलेल्या कचऱ्याचे ढिगारे पालखी तळावरून हटवले.

फलटण पालखी तळाची स्वच्छता झाल्यानंतर ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र.

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी संपूर्ण पालखी सोहळ्यातील प्रशासन व स्वच्छता कार्याची देखरेख करत उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे नागरिकांनी नमूद केले.

फलटण नगरपालिकेच्या कार्यपद्धतीमुळे या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचे यश अधिक सुनिश्चित झाले आहे. यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे चांगले उदाहरण समोर आले असून, आगामी काळातही अशाच प्रकारे सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.


Back to top button
Don`t copy text!