भगवंतांची भक्ती करणारा ज्ञानी भक्त श्रेष्ठ : ह भ प विजय महाराज खवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


अध्याय सातवा : ज्ञानविज्ञानयोग 

स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि . 19 : आज कोरोनाच्या महामारीत आपली आषाढी पायी वारी रद्द झाली आहे . आषाढीचा हा सोहळा म्हणजे भूवैंकुठावरील स्वर्ग सुख आहे. या सुखाला आपण पारखे झालो असलो तरी श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपणाच्या माध्यमातून आपली भगवंत भक्ती सुरु आहे आणि अशी भगवंतांची भक्ती करणारा  ज्ञानी भक्त श्रेष्ठ होय असे मत ह भ प विजय महाराज खोले यांनी व्यक्त केले .

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफएम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( शुक्रवार ) सातव्या दिवशी मोताळा ( जि बुलढाणा ) येथील ह भ प विजय महाराज खवले यांनी ज्ञानविज्ञानयोग या सातव्या अध्यायावर निरुपण केले .

आतां अज्ञान अवघे हरपे l

विज्ञान नि:शेष करपे l

आणि ज्ञान तें स्वरुपे l

होऊनि जाईजे ll

ह भ प खवले महाराज  या अध्यायाचे निरुपण करताना म्हणाले ,  भगवंतांनी या अध्यायात ज्ञानविज्ञानयोग सांगितला आहे .भगवंत सांगतात  अर्जुना तु योगयुक्त झालेला आहेस . परंतु परमात्म स्वरुपात यथार्थ रुपाने ज्ञानी झाला नाहीस . हे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर मला जाणून घे . मी तुला विज्ञानासह ज्ञान सांगेन . विज्ञानाचे स्वरुप जाणल्यानंतर ब्रम्हाचे अपरोक्षज्ञान होते आणि त्या वेळी  ” मी ब्रम्ह आहे ” याची प्रचिती होते . हजार लोकांत एखादीच व्यक्ती ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करते आणि प्रयत्न करणाऱ्या सिध्दांमध्ये देखील कोणीतरी एखादाच मला तत्व:ता जाणतो . हे अर्जुना सोन्याच्या साखळीत जसे सोन्याचे मणी गुंफलेले असतात तद्वत माझे ठिकाणी सर्व विश्व गुंफले आहे . हे भरतश्रेष्ठा दु:खाने त्रासलेला , अपेक्षा बाळगणारा , द्रव्यलोभी आणि ब्रम्हज्ञान प्राप्त झालेला असे चार प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात परंतु या सर्वात ज्ञानी भक्तच मला प्रिय आहे आणि तोच खरा श्रेष्ठ भक्त होय . ज्यांनी अधिभूतासह मला ज्ञानाच्या हाताने धरुन अधिदैवापर्यंत नेउन भिडविले . ज्यांना पूर्ण ज्ञानाच्या बळाने माझे परब्रह्मस्वरुप दिसू लागले आहे तो सदैव  सुखी राहतो असे सांगून ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे सर्व जीवांची   तृप्ती व अज्ञान निवारण करणारा तसेच साधकांची  अध्यात्मिक भूक भागविणारा ग्रंथ असल्याचे ते म्हणाले .  या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .

उद्या शनिवार दि . २० रोजी मुक्ताईनगर ( जि जळगाव ) येथील ह भ प विशाल महाराज खोले हे  सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या ब्रम्हाक्षरनिर्देशयोग या आठव्या अध्यायावर निरुपण करतील .

दरम्यान आज ( शुक्रवार ) श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांचे हस्ते करण्यात आली . या पुजेचे पौरोहित्य यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी केले . माउलींसमोर शिरवळकरांच्या वतीने कीर्तनाची तर जळगावकरांच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!