राष्ट्रवादीच्या पॅनेलला गोरे बंधूच्या स्वतंत्र पॅनेलचे आव्हानं; जिल्हा बँकेच्या 18 जागांसाठी 450 अर्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या अपेक्षांना आमदार जयकुमार गोरे व शिवसेना नेते शेखर गोरे यांनी धक्का दिला . गोरे बंधूनी स्वतंत्र पॅनेल टाकण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने जिल्हा बँकेत तिरंगी लढत होण्याची शक्यता बळावली आहे . राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी तर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी शक्ती प्रदर्शनाद्वारे अर्ज भरले . जिल्हा बँकेच्या तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर राजकीय घडामोडींना वेग आला होता . अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 18 जागांसाठी साधारण 450 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली .

जिल्हा बँकेच्या निवडणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी रंगतदार वळणावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेश पॅनेलच्याविरोधात आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चार जागा वगळता उर्वरित सर्व मतदारसंघातून उमेदवार दिले आहेत. तसेच शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनीही बहुतांशी मतदारसंघात उमेदवार दिल्याने त्यांचेही स्वतंत्र पॅनेल होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीच्या विरोधात गोरे बंधूंची दोन पॅनेल उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच शशीकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह नेत्यांनी एकत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या निवडक समर्थकांसह आले व त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे हे शासकिय विश्रामगृहात थांबले होते. तेथून शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसह दोघे जिल्हा बँकेत चालत आले. तेथे त्यांनी एकत्र सर्व अर्ज दाखल केले. दोन चार जागा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते शेखर गोरे हे त्यांच्या समर्थकांसह जिल्हा बँकेत दाखल झाले. त्यांनीही स्वत: सह इतर बहुतांशी जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनीही तिसरे पॅनेल टाकण्याचे सुतोवाच केले आहे. दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची जिल्हा बँकेत गर्दी झाली होती. करोनाचा संसर्ग कमी झालेला असतानाही जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी झाल्याचे दिसत होते.

राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधील तिन उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये खरेदी विक्री संघ मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे तसेच कृषी उत्पन्न प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे.

पालकमंत्री व उदयसिंह पाटील यांच्यात समन्वयाचा प्रयत्न

जिल्हा बँकेच्या एका दालनात विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील व अ‍ॅड उदयसिंह पाटील यांच्यात कमरा बंद चर्चा झाली . पालकमंत्री हे सोसायटी मतदार संघातून इच्छुक आहेत . स्व . विलासकाका पाटील उंडाळकर यांचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने तो पारंपारिक मतदार संघ सोडायला उदयसिंह पाटील तयार नाही . राष्ट्रवादी पुढे तोच मोठा पेच आहे . कमराबंद चर्चेत याच मुद्यावर राजकीय खलं झाला पण स्वतः पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी इन्कार केला . आज फक्त राष्ट्रवादीच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले . काही राजकीय पेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार्‍या बैठकीत सोडविले जातील असे पाटील यांनी सांगितले .


Back to top button
Don`t copy text!