स्थैर्य, पुणे, दि. १३: पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा तिच्यासोबत दोघेजण उपस्थित होते. तिला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेल्यावर शेजाऱ्यांनी फैलावर घेतल्यावर या दोघांपैकी एका तरुणाने कथित मंत्र्यासोबतच्या संभाषणाच्या क्लीप या स्थानिकांना दिल्याचे समोर आले आहे.
पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घे असे हे संबंधित मंत्री अरुण राठोडला सांगत होते. यवतमाळमध्ये 2 फेब्रुवारीला अॅडमिट असलेली व्यक्ती ही पूजाच होती असे या अरुण याने दिल्याचे पोलिस अधिकाऱ्याने एका टीव्ही चॅनेलला सांगितले. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तिच्यासोबत असलेले तरुण हे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तिथे आले होते. त्या दोघांना पूजाने आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी पकडून ठेवले होते, असे समजते. अरुण राठोडला या मंत्र्यानेच नोकरीला लावले होते. पूजाचा लॅपटॉप अद्याप सापडलेला नाही, असे समजते.
पूजाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर शेजारीही तिथे पोहोचले होते. त्यांनी या दोन्ही तरुणांना फैलावर घेतले. तेव्हा त्यांनी ते इथे का आले होते, हे सांगितले. अरुण राठोडने घाबरून आणि सुटका करून घेण्यासाठी या 10-12 ऑडिओ क्लीप शेजाऱ्यांकडे दिल्या. तसेच हे पुरावे आपणही ठेवल्याचे त्यांना सांगितले.
राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची दखल घेण्याची विनंतही करण्यात आली होती. या विनंतीनुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी हे आदेश दिले आहेत. पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे.
यावर राठोड यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही. तसेच फोनवरही बोलणे झालेले नाही. याउलट मातोश्रीवरून राठोड यांना तसेच अन्य नेत्यांना या प्रकरणावर प्रसारमाध्यमांमध्ये काहीच बोलू नये, असे आदेश गेलेले आहेत.