गरिबांचा आधार गेला


स्थैर्य, लोणंद, दि. २७: पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या लोणंद गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिलेले जेष्ठ नेते बाळासाहेब बागवान यांच्या निधनाने परिवर्तनवादी सामाजिक चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

रुढार्थाने शैक्षणिकदृष्टया मागास असलेल्या मुस्लिम समाजात बाळासाहेबांचा जन्म झाला. परंतू बाळासाहेब लहानपणापासूनच कालबाह्य रुढी-परंपरांना फाटा देऊन स्वतंत्र विचाराने चालत राहिले. ज्या काळात मुस्लिम समाजातील मुले अभावानेच शाळेत जात होती, त्याकाळी बाळासाहेबांनी स्वतः वकिलीपर्यंत शिक्षण घेऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. मात्र काळा कोट घालून कोर्टात वकिली करण्यात ते कधी रमले नाहीत. त्यांनी विविध चळवळींद्वारे हयातभर जनतेची वकिली करण्यात धन्यता मानली. विशेषतः सामान्य, गरीब माणूस त्यांनी केंद्रबिंदू मानला. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांनी सतत आपली विकीलीची सनद आणि राजकीय ताकद पणाला लावली. हमाल-मापाडी, स्वच्छता कर्मचारी, भंगार गोळा करणाऱ्या आणि झाडलोट करणाऱ्या महिला, दैनंदिनीवर काम करणारे मजूर यांच्या न्यायहक्कासाठी लोणंद सारख्या अविकसित गावात बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या संघटना त्यांच्या सुधारणावादी विचारांची साक्ष देतात. हमाल पंचायत आणि पाणी पंचायतीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी केलेले काम जनतेला कधीही विसरता येणार नाही.

बाळासाहेबांच्या निधनामुळे लोणंद रेल्वेस्टेशन, लोणंद मार्केट कमिटी आणि वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये राबणारा मजूर आज पोरका झाला. साफसफाई करणाऱ्या आणि भंगार गोळा करणाऱ्या दीनदुबळ्यांचा कैवारी आज गेला. होय, बाळासाहेबांचे या सामान्य माणसांवर विलक्षण प्रेम होते. या सगळ्यांचे ते आधारवड होते.

बाळासाहेब हा एक लढवय्या नेता होता. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची पक्की जाण त्यांना होती. शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही अशी त्यांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी पाणी पंचायतीची स्थापना केली. खंडाळा आणि फलटण तालुक्याला वरदान ठरणारा नीरा देवधर धरण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभा केला होता. मोठया राजकीय शक्तींच्या विरोधात नीरा देवधरच्या पाण्यासाठी उघड संघर्ष करणारा खंडाळा तालुक्यातील हा एकमेव नेता होता. 1995 साली लोणंदमध्ये झालेली ‘पाणी परिषद’ यशस्वी करण्यासाठी बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी मलाही मिळाली होती. अत्यंत संयमी तरीही आक्रमक भासणारे भाषण करण्यात बाळासाहेबांचा हातखंडा होता. ते फर्डे वक्ते नव्हते पण जनतेशी जिव्हाळयाने संवाद साधत अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात बाळासाहेब तरबेज होते. लोणंदच्या पाणी परिषदेत त्यांनी माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला भाषण करण्याची संधी दिली आणि नंतर माझ्या भाषणाचे जाहीर कौतुकही केले. खास या परिषदेसाठी दिल्लीहून आलेल्या पत्रकारांना माझी मुलाखतही घ्यायला लावली होती.

काँग्रेसच्या विचारधारेवर बाळासाहेबांची नितांत श्रद्धा होती. काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ते ओळखले जात. विशेषतः आदरणीय प्रेमिलाकाकी चव्हाण आणि आम. पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्यावर त्यांनी अखंड प्रेम केले. आपले संपूर्ण राजकारण त्यांनी काकी व बाबांच्या नेतृत्वाखाली केले. त्याचा त्यांना अभिमानही वाटत असे. बहुजनांच्या साथीने लोणंद ग्रामपंचायतीची सत्ता अनेक वर्षे आपल्या विचारांच्या हाती ठेवण्यात त्यांनी यश मिळवले. या ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यात आणि महत्वाची अनेक विकास कामे पूर्ण करण्यात बाळासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील लोणंद ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील अग्रेसर ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती. मात्र कुरघोडीच्या राजकारणात ते कमी पडले आणि जातीपातीचे राजकारण करणारांनी त्यांना कधीही साथ दिली नाही. अन्यथा बाळासाहेबांच्या नेतृत्वाने फार मोठा पल्ला गाठला असता.

बाळासाहेबांचं आकस्मित जाणं हे धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. एक निगर्वी, संयमी, अभ्यासू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. बाळासाहेब बागवान यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली..

– राजेंद्र शेलार, भिवडी (कोरेगाव)
प्रदेश प्रतिनिधी, महाराष्ट्र काँग्रेस


Back to top button
Don`t copy text!