राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन


दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । मुंबई । राज्यात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या १६ लाख कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख शिक्षकांचा समावेश आहे. आज, सोमवारी संपावर असलेले सर्व शिक्षकांनी राज्यभरातील निरीक्षक कार्यालये, शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने केली. शाळा-महाविद्यालयांसमोर दुपारी १२ ते १२.३० या कालावधीत थाळीनादही करण्यात आला. अखेर, सातव्या दिवशी संपावर तोडगा काढण्यास सरकारला यश आलं आहे. त्यानुसार, संपातील संघटनांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधकांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे लक्ष वेधले, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असल्यावरही विधिमंडळात आवाज उठवला. त्यामुळे, आज कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाण्याची शक्यता सकाळपासूनच वाटत होती. संपातील कर्मचारी व अधिकारी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अखेर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात विधानसभेत निवेदन सादर करणार आहेत. दरम्यान, या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यास गती मिळणार आहे. तर, गेल्या ६ दिवसांपासून रुग्णालयात होत असलेल्या रुग्णांची गैरसोय दूर होऊन सुरळीत उपचार सुरू होती. त्यासोबतच, शासकीय कार्यालयात नागरिकांना पुन्हा सेवा सुरू होणार असून शाळा, कॉलेजेस आणि विद्यार्थ्याच्या परीक्षांवर होणारा परिणाम टाळण्यास मदत होईल.


Back to top button
Don`t copy text!