
दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२३ । मुंबई । महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून संपूर्ण देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असणार आहे.
मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे ५४ संघटना असून या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. या फेडरेशनची स्थापना १ मे १९६० रोजीच झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले असून त्याच्या विस्तारासंदर्भातील सुद्धा काही मागण्या आहेत.
या दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात. या टप्पा-२ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी यांनी ८ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी चर्चा करण्यात आली.
या दौर्यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटणार असून, काही सामंजस्य करारावर सुद्धा स्वाक्षरी होणार आहेत. दौऱ्यात पर्यटन अणि उद्योग क्षेत्रात महत्वाचे करार अपेक्षित आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटणार आहेत.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					